राहुल कुलकर्णी, पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती. साताऱ्यातील कराड येथील RSS शाखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती. संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. कराडच्या शाखेत आंबेडकरांनी भेट दिल्याप्रीत्यर्थ कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली त्यावेळी 'संघाकडे आपलेपणाने पाहतो' असे उद्गार काढले होते. केसरीच्या 9 जानेवारी 1940 रोजीच्या अंकात बाबासाहेब आंबेडकरांनी कऱ्हाडच्या संघाच्या शाखेला भेट दिल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. पान 13 वर ही बातमी प्रसिद्ध झाली होती. केसरीतील 'वर्तमानसार'मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती. 2 जानेवारी रोजी आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती.
महात्मा गांधींनीही संघशाखेला भेट दिली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ विशिष्ट जातीपुरती मर्यादित आहे, हा आरोप खोडून काढताना संघाच्या माध्यम विभागाने महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघशाखांना दिलेल्या भेटींचा उल्लेख केला आहे.
महात्मा गांधींनी 1934 साली वर्ध्यातील संघशाखेला भेट दिली होती. या भेटीत गांधीजींना शाखेमध्ये सर्व जाती-धर्मांतील स्वयंसेवक असल्याचे लक्षात आले. “स्वयंसेवकांना दुसऱ्यांची जात किंवा धर्म विचारण्याची गरज नसते. त्यांच्या मनात हिंदुत्वाची भावना असते, असा अनुभव गांधीजींना आल्याचा दावा संघाच्या ‘विश्व संवाद केंद्रा'च्या निवेदनातून करण्यात आला आहे.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 रोजी कराडमधील संघ शाखेला भेट दिल्याचा दावा संघाच्या माध्यम विभागाने केला आहे. या भेटीत त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला होता आणि संघटनेबद्दल आत्मियता व्यक्त केल्याचेही नमूद केले आहे. या घटनेचा संदर्भ म्हणून 9 जानेवारी 1940 च्या केसरी वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण देखील दिले आहे.
दत्तोपंत ठेंगडी यांच्या ‘डॉ. आंबेडकर आणि सामाजिक क्रांतीची यात्रा' या पुस्तकातील उतारेही या दाव्याला समर्थन देण्यासाठी वापरण्यात आले आहेत. ठेंगडी यांनी आपल्या पुस्तकात संघाचे नेते आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील वैचारिक संबंध उलगडून दाखवले आहेत, असेही ‘विश्व संवाद केंद्रा'च्या निवेदनात म्हटले आहे.
गांधीजी आणि आंबेडकर यांच्या या भेटींचा हवाला देत, संघावर असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न संघाच्या माध्यम विभागाकडून केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world