मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये डीआरआयच्या मुंबई विभागीय युनिटने अंदाजे 11.25 कोटी रुपये किमतीचे 2.25 किलो कोकेन जप्त केले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अमली पदार्थांच्या कॅप्सूल पोटात गिळून तस्करी करणाऱ्या चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
पोटात लपवल्या होत्या कॅप्सूल
पहिल्या कारवाईत विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी 22 मे 2026 रोजी पहिली मोठी कारवाई केली. इथिओपियातील अदिस अबाबाहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका परदेशी महिला आणि पुरुष प्रवाशाला अधिकाऱ्यांनी संशयावरून अडवले. अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल चौकशी केली असता, त्याने तस्करीसाठी अमली पदार्थांनी भरलेल्या कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्या प्रवाशाला तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्या पोटातून एकूण 84 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कॅप्सूलमध्ये 1.40 किलो कोकेन आढळले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.
(नक्की वाचा- LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)
दुसरी कारवाई
यापूर्वी 19 मे रोजी डीआरआयने अशाच पद्धतीची दुसरी कारवाई केली होती. अदिस अबाबाहून मुंबईत आलेल्या एका आफ्रिकन पुरुष आणि आफ्रिकन महिला प्रवाशाला विमानतळावर संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांनीही अमली पदार्थांच्या कॅप्सूल सेवन केल्याचे मान्य केले. त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या शरीरातून 63 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. यात 850 ग्रॅम कोकेन होते, ज्याचे अवैध बाजारातील मूल्य जवळपास 4.25 कोटी रुपये आहे.
(नक्की वाचा- Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )
NDPS कायद्यांतर्गत चौघे अटकेत
तस्करांनी अमली पदार्थ शरीराच्या आत लपवून सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्याचा हा धोकादायक प्रयत्न केला होता. मात्र, डीआरआयच्या सतर्कतेमुळे हा कट अपयशी ठरला. जप्त करण्यात आलेले कोकेन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यानुसार जप्त करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये सामील असलेल्या चारही परदेशी प्रवाशांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.