ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव 'ड्राय डे' जाहीर केला आहे. 14 जानेवारीला या तिन्ही शहरांमध्ये मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या तीन मोठ्या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 14 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण दिवस 'ड्राय डे' पाळण्याचे आदेश दिले आहेत.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
का घेतला हा निर्णय?
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मतदानाच्या 48 तास आधीपासून आणि मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येते. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मद्याचा वापर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलमानुसार हा कायदेशीर आदेश लागू करण्यात आला आहे.
कोणत्या दुकानांवर परिणाम होणार?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील. वाईन शॉप्स, बिअर बार आणि रेस्टॉरंट्स जिथे बसून मद्यप्राशन केले जाते. देशी दारूची दुकाने, क्लब आणि रिसॉर्ट्स, इतर संबंधित परवाने असलेली ठिकाणे बंद राहतील.
(नक्की वाचा- What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर)
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन केले, त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात किंवा त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल. 16 जानेवारीला मतमोजणी होणार असल्याने, त्या दिवशीही निकालापर्यंत काही ठिकाणी निर्बंध राहण्याची शक्यता आहे.