समुद्रातील मासेमारीचा हंगाम संपल्यामुळे सुक्या मासळीचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. आगोटीसाठी ओल्या मासळीबरोबर सुक्या मासळीलाही राज्यभरातून मागणी वाढल्याने दर भडकल्याचे सांगितले जात आहे. मालवण खाडी परिसरात मच्छीमार बांधवांचे दिवसभर उन्हात राहून मासळी सुकवण्याचे काम सुरू आहे. यात बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि आंबाडी या माशांचे प्रमाण अधिक दिसते. 1 जूनपासून मासेमारी बंद आहे. सध्या मच्छिमारांकडे सुके मासे हा एकच पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे अनेक मच्छिमारांनी मासळी सुकविण्यास प्राधान्य दिलं आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने लोकं हजारो रुपयांचे सुके मासे खरेदी करतात. हे सुके मासे आता खवय्यांना चढ्या दराने खरेदी करावे लागत आहेत.
सुक्या मासळीच्या कुडाळ येथील बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली असून सुक्या मासळीची ऑनलाईन ऑर्डर घेऊन घरपोच मासळी पोहोचवली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छिमार बांधवांकडून मासळी सुकविण्याचं काम सुरू आहे. यात पापलेट, सुरमई, सरंगा, बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकुल या माशांचे प्रमाण अधिक दिसते.पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने खवय्यांची सर्व मदार सुक्या माशांवरच असते. त्यामुळे पावसाळा सुरू होताच नागरिकांकडून पुढील दोन ते तीन महिन्यांची तरतूद करून ठेवली जाते. सुके मासे साठवून ठेवले जातात. मात्र सुक्या माशांच्या किंमतीत वाढ झाल्याने खवय्यांना जीभेचे चोचले पुरविताना अधिक खिसा रिकामी करावा लागणार आहे. पावसाळ्यापूर्वीच मच्छिमार मासे सुकवण्याचं कामही सुरू करतात. माशांना मीठ लावून जाळीवर उन्हाळ वाळवले जातात. हे मासे बरेच दिवस टिकतात. त्यामुळे बाजारात त्याची किंमतही जास्त असते.
नक्की वाचा - कुठेय समानता? भारतात स्त्री-पुरुषांच्या वेतनात मोठी तफावत, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सची धक्कादायक आकडेवारी
मासळीचे भाव कडाडले (प्रती किलो दर)
पापलेट - 1200
सुरमई - 1400
सरंगा - 700
कोलंबी - 400
सुका जवळा - 400
बोंबील - 800
करदी - 600
वाकटी - 1000
सुके सोडे - 2000
टेंगळी सुकट - 600
बांगडा (1 नग) - 30
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world