Kalyan News: कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या धार्मिक स्थळावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एका बाजूला सण साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला मंदिरातील प्रवेशावरून नवा वाद उफाळून आला आहे. हा वाद केवळ धार्मिक राहिला नसून, आता त्याला राजकीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
येत्या 27 मे रोजी बकरी ईद साजरी होणार आहे. या दिवशी दुर्गाडी किल्ला परिसरातील ईदगाहवर नमाज पठण केले जाते. मात्र, याच काळात सुरक्षेच्या कारणास्तव गडावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात भाविकांना जाण्यासाठी काही काळ निर्बंध लादले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून यंदा या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
घंटानाद आणि आंदोलनाचा इशारा
हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांनी या मंदिर प्रवेशबंदीला कडाडून विरोध दर्शवला आहे. रस्त्यावर नमाज पठण करू नये आणि मंदिरात भाविकांना मुक्त प्रवेश मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने ही प्रवेशबंदी हटवली नाही, तर बकरी ईदच्या दिवशी गडावर हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्याचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपा आणि इतर संघटनांनी दिला आहे. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली.
( नक्की वाचा : 24 व्या वर्षी झाला IPS, पण एका चुकीने सगळंच संपलं! आता संपत्तीही जाणार; वाचा काय आहे प्रकरण? )
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली
या संपूर्ण प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असतानाही हिंदूंना स्वतःच्याच मंदिरात जाण्यासाठी मागणी करावी लागते, ही मोठी शोकांतिका असल्याचे ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी म्हटले आहे. आपल्याच सरकारकडे मंदिर प्रवेशासाठी निवेदन देण्याची वेळ सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर येते, हे लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
विरोधकांची टीका
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणादरम्यान दुर्गाडी देवी मंदिरात भाविकांच्या प्रवेशावर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांच्या मुद्द्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
( नक्की वाचा : Love Story : प्रियकराला भेटायला शेतात गेली अन् थेट सासरीच पोहोचली; 5 वर्षांच्या मुलासह आईची पाठवणी! )
सरकारच्या ध्येयधोरणांमुळेच दोन समाजांमध्ये तिढा निर्माण होत आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करावे, मात्र ते करताना सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही समाजाने दुसऱ्या समाजाला विरोध करू नये,” असे मत खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
दुसरीकडे, शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीत आपली भूमिका मांडली. प्रत्येक धर्माला समान अधिकार असायला हवेत, मग केवळ हिंदू भाविकांवरच निर्बंध का, असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आला. पोलीस प्रशासनाने मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. आता 27 मे रोजी पोलीस प्रशासन या परिस्थितीचा सामना कसा करते आणि भाविकांच्या मागणीवर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world