येरवडाच्या तुरुंगात कैद्यांसाठी राबवणार 'वाचन संस्कृती', नव्या उपक्रमाची सुरुवात

1866 मध्ये उभारण्यात आलेलं, महाराष्ट्रातील सर्वात मोठं पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

1866 मध्ये उभारण्यात आलेलं, महाराष्ट्रातील सर्वात मोठं पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail in Pune ) कैद्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. 2021 पासून प्रशासनाकडून तुरुंग पर्यटनाचा उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय गेल्या वर्षी कैद्यांसाठी फोनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता येरवडा कारागृह प्रशासनाने कैद्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी आणखी एक उपक्रम सुरू केला आहे. 

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांना शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी विषयातील प्रसिद्ध पुस्तकं संगणकावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

कारागृहातील कैद्यांसाठी 'ई-लायब्ररी' हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या ई-लायब्ररीमधील विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात कैद्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली असून या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होईल, असे कारागृहाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या लायब्ररीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, आर. ई गायकवाड, एम. एच. जगताप, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंदा कांदे आदी उपस्थित होते. 

Advertisement

गेल्यावर्षी पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांसाठी फोनची सुविधा सुरू करण्यात आली होती. महिन्यातून तीन वेळा घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी कैद्यांना फोनवर बोलता येऊ शकतं. प्रत्येक कॉलवर कैद्याला आपल्या नातेवाईकांसोबत १० मिनिटं बोलता येऊ शकतं. म्हणजे एक कैदी महिन्यातून ३० मिनिटे आपल्या घरच्यांशी बोलू शकतो. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला.