राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप राज्यात 130 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद भाजपला मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे एकनाथ शिंदेंची समजून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीत कोणतंही नाराजीनाट्य घडू नये, यासाठी समोपचारानं मार्ग काढण्याचं काम सुरू आहे. विधानसभेतील यशामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली असल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर शिंदे गटातील नेते ठाम आहेत. तर भाजपला 130 पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे.
(नक्की वाचा- 'ट्रम्पेट'चा गोंधळ कायम, निवडणूक चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवारांचे 7 आमदार पराभूत)
दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावण्याचे प्रयत्न भाजप पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहेत. चर्चेतूनच या पेचप्रसंगातून मार्ग काढला जाणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
सर्व गोष्टी झाल्यानंतर निरीक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती आहे. आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजधानी दिल्ली येथे पाच वाजता शासकीय कार्यक्रम असल्यानं अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता कमी आहे.
(नक्की वाचा - VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला)
शिवसेनेचे खासदार पंतप्रधानांच्या भेटीला
शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मागितली आहे. विद्यमान 7 खासदार आणि 4 माजी खासदार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्याशी हे खासदार चर्चा करणार आहेत.