Navi Mumbai News: इलेक्ट्रिक कार क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्ला (Tesla) ने भारतीय बाजारपेठेत आपले पाय अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी टेस्लाने नवी मुंबईतील प्रसिद्ध नेक्सस सीवूड्स मॉल (Nexus Seawoods Mall) मध्ये आपल्या पहिल्या 'इन-मॉल' चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण केले. मॉलच्या B1 पार्किंगमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ग्राहकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
चार्जिंग स्टेशनची वैशिष्ट्ये
या नवीन चार्जिंग स्टेशनमध्ये एकूण 8 चार्जर्स बसवण्यात आले आहेत, जे ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतील.
V4 सुपरचार्जर्स (4 युनिट): हे 250 kW पर्यंत वेगाने डीसी (DC) फास्ट चार्जिंग प्रदान करतात. टेस्ला मॉडेल Y ही कार केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 275 किमी पर्यंत धावू शकते.
डेस्टिनेशन चार्जर्स (4 युनिट): हे 11 kW वेगाने एसी (AC) चार्जिंग देतात, जे मॉलमध्ये जास्त वेळ घालवणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहेत.
मोबाईल ॲप इंटिग्रेशन: ग्राहक टेस्ला मोबाईल ॲपद्वारे स्टेशन शोधू शकतात, चार्जिंग प्रोग्रेस तपासू शकतात आणि पेमेंटही करू शकतात.
(नक्की वाचा- Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)
टेस्लाचे भारतातील चौथे ठिकाण
नवी मुंबईतील हे स्टेशन टेस्लाचे भारतातील चौथे चार्जिंग लोकेशन आहे. याआधी गुरुग्राम, दिल्ली आणि मुंबईत टेस्लाने आपली स्टेशन्स सुरू केली आहेत.
नेटवर्क विस्तार: आता टेस्लाच्या नेटवर्कमध्ये भारतात 20 सुपरचार्जर्स आणि 14 डेस्टिनेशन चार्जर्सचा समावेश झाला आहे.
पॉप-अप स्टोअर: चार्जिंग स्टेशनसोबतच मॉलच्या मुख्य भागात टेस्लाने एक 'पॉप-अप स्टोअर' देखील उभारले आहे, जिथे नागरिक टेस्ला कार पाहू शकतात आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घेऊ शकतात.
(नक्की वाचा- Nagpur News: जनगणनेचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर नागपुरात गुन्हे दाखल होणार; महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय)
ग्राहकांसाठी सोयीचे ठिकाण
"आम्ही अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रित करत आहोत जिथे ग्राहक आपला दैनंदिन वेळ घालवतात, जसे की मॉल्स आणि हायवे स्टॉप्स. यामुळे ग्राहकांना खरेदी किंवा जेवण करत असताना आपली कार सहजपणे चार्ज करता येईल," असे टेस्लाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.