नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच, या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे पनवेलमधील मोसारे गावच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका 'मॅगझिन'मध्ये (स्फोटक साठवणूक केंद्र) मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटरचा साठा करण्यात आला असून, येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत सुमार असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सुरक्षा नियमांची ऐशीतैशी?
सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी परिसरातील डोंगर कापणे, ब्लास्टिंग करणे आणि मोठ्या प्रमाणावर भू-सुधारणा करण्याची कामे सुरू आहेत. या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर केला जात असल्याने त्यासाठी आवश्यक असलेला साठा या मॅगझिनमध्ये ठेवण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या स्फोटक साठ्याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नवी मुंबईमधील उलवे, उरण, पनवेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकासक या ब्लास्टिंगचा वापर करतात. कारण त्याच्यामुळे करोडो रुपयांचा विकासकांचा खर्च वाचला जातो. परंतु जिलेटिन आणि डीटीनेटर या ब्लास्टिंगचे काही नियम अटी याचे उल्लंघन करून विकासाक अगदी पाचशे मीटर ज्या ठिकाणी घरी वस्ती आहे तिथे सुद्धा ब्लास्टिंग करीत आहेत.
(नक्की वाचा- IPL 2026: SRH ला मिळणार नवा कर्णधार? टी20 वर्ल्ड कप गाजवणारा 'धुरंधर' करणार हैदराबादचं नेतृत्व?)
मॅगझिन म्हणजे काय?
ब्लास्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन कांड्या, डेटोनेटर आणि इतर स्फोटके सुरक्षितपणे साठवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार उभारण्यात येणाऱ्या विशेष स्टोरेजला “मॅगझिन” असे म्हटले जाते.
अशा ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असणे बंधनकारक असते. मजबूत बांधकाम, सुरक्षित लॉकिंग सिस्टम, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, चेतावणी फलक, परिसरात प्रवेशबंदी आणि नियमित तपासणी ही सर्व व्यवस्था असणे आवश्यक असते. कारण स्फोटकांचा साठा असलेली ठिकाणे अत्यंत संवेदनशील मानली जातात.
मात्र मोसारे गावाजवळ उभारण्यात आलेल्या या मॅगझिनमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिसरात ना पुरेसे सुरक्षा रक्षक दिसतात, ना कडक देखरेख. त्यामुळे भविष्यात स्फोटकांची चोरी होण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणतेही CCTV यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आले नाही.
शाळा आणि गाव हाकेच्या अंतरावर
या मॅगझिनपासून काही अंतरावर मोसारे गाव तसेच जिल्हा परिषद शाळा असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील अनेक घरे आणि विद्यार्थ्यांची शाळा या स्फोटक साठ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर त्याचा थेट परिणाम गावावर आणि शाळेतील विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
फायर सेफ्टी आणि आपत्कालीन व्यवस्था नाही
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मॅगझिन परिसरात कोणत्याही प्रकारची ठोस फायर सेफ्टी प्रणाली किंवा आपत्कालीन यंत्रणा दिसून येत नाही. स्फोटके साठवली जात असताना अग्निशमन यंत्रणा, पाण्याची उपलब्धता, आपत्कालीन रस्ता आणि बचाव व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक असते. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्ताही नसल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल किंवा ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचणे कठीण होऊ शकते.
(नक्की वाचा- 'Dhurandhar' Trailer: धुरंधर सिनेमातील 'या' कलाकाराची वाढली डोकेदुखी; रोज मिळत आहेत धमक्या)
उष्म्यामुळे वाढतो धोका
सध्या नवी मुंबई परिसरात तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. उन्हाळ्यात डोंगराळ भागात अनेकदा वनवा लागण्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी आदिवासी समाज डोंगर मोकळा करण्यासाठी झाडांना आग लावतात, अशीही माहिती स्थानिकांकडून देण्यात येते. अशा परिस्थितीत जर एखादी आगीची ठिणगी या स्फोटक मॅगझिनपर्यंत पोहोचली तर मोठा स्फोट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जमीन वन विभागाची आहे का?
स्फोटक मॅगझिन उभारण्यात आलेली जमीन वन विभागाच्या अखत्यारीत येते का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर ही जमीन वनक्षेत्रात येत असेल तर संबंधित प्रकल्पासाठी वन विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात आले आहे का? जर ही जमीन खाजगी मालकीची असेल तर ती कोणत्या नियम व अटी प्रमाणे यांना भाडेतत्त्वावर दिली आहे. आणि अशा प्रकारच्या कामांसाठी अशी खाजगी जमीन भाडे तत्त्वावर देण्यासाठी कोणते नियम आहेत? पोलिसांनी याची तपासणी केली आहे का? याची चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पाच्या अगदी जवळ मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा ठेवण्यात येत असल्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. योग्य देखरेख आणि कडक सुरक्षा नसल्यास भविष्यात हा साठा गंभीर सुरक्षा धोका ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जर संबंधित मॅगझिनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त स्फोटके साठवून ठेवली असल्याचे तपासात सिद्ध झाले तर या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून कोणती कारवाई केली जाते याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.