Farmer Suicide: लेकाची मेडिकलची फी कशी भराचयी? हतबल शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

पीक नष्ट झाल्यामुळे मधुकर पळसकर यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. त्यांचा मुलगा हैदराबाद येथे MBBS चे शिक्षण घेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुमीत पवार, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांने हतबल होऊन आयुष्य संपवल्याची घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बकापूर-पळशी येथे घडली आहे. मधुकर सर्जेराव पळसकर (वय 54 वर्षे) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. मुलाच्या वैद्यकीय शिक्षणाची फी आणि डोक्यावरील कर्जाची चिंता सहन न झाल्याने पळसकर यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मधुकर पळसकर हे बकापूर येथे आपल्या कुटुंबासह शेती करत होते. शहरापासून जवळ असल्याने ते आपल्या शेतात भाजीपाल्याचे पीक घेत असत. त्यांच्या शेतात सध्या कोबीचे पीक काढणीला आले होते. हे पीक विकून कुटुंबाचे उदरनिर्वाह आणि मुलाच्या शिक्षणाची फी भरायची, अशी त्यांची योजना होती.

( नक्की वाचा : Akola News : 'प्रशासन ऐकत नाही, म्हणून फाशी घेईन', अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच नागरिकाचा संताप )

मात्र, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या संपूर्ण शेतात पाणी साचले आणि कोबीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले पीक पाण्यात सडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

कर्ज आणि मुलाच्या शिक्षणाची चिंता

पीक नष्ट झाल्यामुळे मधुकर पळसकर यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. त्यांचा मुलगा हैदराबाद येथे MBBS चे शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षणामुळे मुलाच्या शिक्षणाची मोठी फी भरायची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यासोबतच त्यांच्यावर एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज देखील होते.

Advertisement

(नक्की वाचा-  Dombivli News: डॉक्टर म्हणाले "तब्येत ठिक आहे", मात्र काही तासातच चिमुकलीसह मावशीचाही मृत्यू)

पीक पाण्यात गेल्यामुळे आता मुलाची फी कशी भरायची आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या गंभीर चिंतेने त्यांना ग्रासले होते. या आर्थिक विवंचनेतूनच त्यांनी मंगळवारी पहाटे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि MBBS शिकणारा मुलगा असा मोठा परिवार आहे. मुलाचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच वडिलांवर अशी वेळ आल्याने पळसकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article