
राज्यासह देशभरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणजेच एनएचएआयच्या अखत्यारितील टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी 'फास्टॅग'चा वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 ऑगस्टपासून याची सुरूवात होईल. शुक्रवारपासून एनएचएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अॅपवर हा वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. हा पास 3000 रुपयां असेल. ज्यांच्याकडे हा पास असेल अशांना एनएचएआयच्या अखत्यारित असलेल्या महामार्गावरून 3000 रुपयांत 200 फेऱ्या मोफत मिळणार आहे. त्यांना या महामार्गांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही.
ही वार्षिक पासची योजना फक्त खासगी चारचाकी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच लागू असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक वाहनांनासाठी ही योजना लागू नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार असल्याचं बोललं जात आहे. द्रुतगती महामार्गांवरील टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, प्रवाशी वाहनचालकांचा वेळ वाचविण्यासाठी ही वार्षिक पास योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यभरातील एनएचएआयच्या अखत्यारितील महामार्गांवरून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यानुसार पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-सोलापूरसह अन्य द्रुतगती महामार्गावर प्रवास करता येणार आहे. मात्र मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर फास्टॅग वार्षिक पासची योजना लागू नसेल. कारण हे महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) च्या अखात्यारित आहेत. दरम्यान स्वातंत्र्यदिनापासून वार्षिक पास योजना सुरू होईल.
फास्टॅग वार्षिक पासची प्रमुख वैशिष्ट्ये ( Features of New Fastag Annual Pass)
- एकदा ₹ 3000 भरल्यानंतर, वर्षभर पुन्हा पुन्हा टोल भरण्याची आवश्यकता नाही.
- हा पास राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यावर वैध असेल.
- वेळ आणि इंधनाची बचत: टोल प्लाझावर थांबून होणारा वेळ आणि इंधन वाचेल. लांब रांगा आणि रोख रक्कम भरण्याच्या समस्याही संपतील.
- लोकल प्रवासातही फायदे: 60 किमीच्या आत प्रवास करणाऱ्या लोकांना वारंवार टोल भरावा लागणार नाही, ज्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लोकांना विशेष दिलासा मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world