जाहिरात

Nitin Gadkari-Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरींची भेट; 'यूट्यूब' डिशचीही रंगली चर्चा!

प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांच्या चर्चेदरम्यान गडकरींनी एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, "यापूर्वी राहुल गांधी यांनीही अमेठीतील काही रस्त्यांबाबत माझ्याकडे विनंती केली होती आणि मी ते काम पूर्ण केले होते.

Nitin Gadkari-Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरींची भेट; 'यूट्यूब' डिशचीही रंगली चर्चा!

भारतीय राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकदा शाब्दिक युद्ध पाहायला मिळते. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात आज एक वेगळेच खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज संसदेतील नितीन गडकरींच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. ही भेट प्रामुख्याने प्रियंका गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातील रस्ते प्रकल्पांबाबत होती. मात्र मिश्किल संवाद आणि गडकरींच्या आदरातिथ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वायनाडच्या 6 रस्ते प्रकल्पांवर चर्चा

प्रियंका गांधी यांनी आपल्या वायनाड मतदारसंघातील 6 महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत गडकरींना निवेदन दिले. यावर चर्चा करताना गडकरींनी स्पष्ट केले की, यातील काही प्रकल्प राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्यावर थेट निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित इतर प्रकल्पांबाबत त्यांनी प्रियंका यांना सकारात्मक आश्वासन दिले.

"भावाचं काम केलं, बहिणीचं का नाही करणार?"

प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांच्या चर्चेदरम्यान गडकरींनी एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, "यापूर्वी राहुल गांधी यांनीही अमेठीतील काही रस्त्यांबाबत माझ्याकडे विनंती केली होती आणि मी ते काम पूर्ण केले होते. आता भावाचं काम केलं आणि बहिणीचं केलं नाही, तर लोक म्हणतील भावाचं केलं पण बहिणीचं केलं नाही." गडकरींच्या या कोटीवर प्रियंका गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

जेव्हा गडकरींनी राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्पांचा उल्लेख केला, तेव्हा प्रियंका गांधी यांनी म्हटलं की, "काही हरकत नाही, राज्यात जेव्हा आमच्या पक्षाचे सरकार येईल, तेव्हा आम्ही हे प्रकल्प बघून घेऊ." केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने चांगली कामगिरी केली आहे, त्याच संदर्भाने प्रियंका यांनी हे विधान केले.

गडकरींची 'यूट्यूब स्पेशल' मेजवानी

केवळ राजकीय चर्चाच नाही, तर गडकरींनी आपल्या खास शैलीत प्रियंका गांधींचे आदरातिथ्यही केले. गडकरींनी आज स्वतः यूट्यूबवर पाहून तांदळाची एक अतिशय चविष्ट डिश बनवून घेतली होती. त्यांनी प्रियंका यांना ही डिश खाल्ल्याशिवाय न जाण्याचा आग्रह केला. आज गडकरींच्या कक्षात येणाऱ्या प्रत्येक खासदाराला ही डिश सर्व्ह केली जात होती. विशेष म्हणजे, डिश इतकी चविष्ट होती की सर्वांनी ती आवडीने खाल्ली, पण गप्पांच्या ओघात त्या डिशचे नाव मात्र कोणालाच आठवत नव्हते!

राजकीय मतभेद बाजूला ठेवून झालेल्या या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com