सुजित आंबेकर, सातारा
सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी आरडाओरड करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, बसस्थानक बाहेर आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदारावर कोयत्याने वार केला आहे. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दत्ता पवार असं जखमी पोलीस हवालदाराचं नाव आहे. दत्ता पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चाैकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरूण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याची माहिती त्यांना प्रवाशांनी दिली.
ट्रेंडिंग बातमी - हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं
त्यानंतर दत्ता पवार बसस्थानकाबाहेर आले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पवार यांनी दंगा घालणाऱ्या तरूणांना हटकले. त्यानंतर धुडगूस घालणारे तरुण तेथून निघून गेले. हवालदार दत्ता पवार हे पुन्हा दंगा होऊ नये म्हणून काही वेळ बसस्थानकाबाहेरच उभे होते.
सुमारे 15 मिनिटानंतर मोपेड दुचाकीवरून चौघेजण त्या ठिकाणी आले. दत्ता पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी शेवटी बसलेल्या तरूणाने त्यांच्या काखेत कोयत्याने वार केला. यानंतर संबंधित तरूण मोपेडवरून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतही दत्ता पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु संबंधित तरूण सापडले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.