पालघर जिल्ह्यातील नालासोपारा आणि संपूर्ण वसई तालुका परिसरात गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. 'एफडीए'च्या विशेष पथकांनी नालासोपाऱ्यातील विविध बाजारपेठा, पानटपऱ्या आणि संशयास्पद दुकानांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत. या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला आहे.
वसई तालुक्यात 7 ते 8 विशेष पथके तैनात
वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गुटख्याची छुपी विक्री होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. याची गंभीर दखल घेत एफडीएने या भागात 7 ते 8 विशेष पथके मैदानात उतरवली आहेत. या पथकांनी केलेल्या अचानक तपासणीदरम्यान 4 ते 5 मोठ्या दुकानांमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि आरोग्याला घातक असलेली सुगंधित सुपारी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याचे आढळून आले.
दुकाने केली सील
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित गुटख्याचा साठा जप्त केला असून, नियमांचे सरळसरळ उल्लंघन करणारी ही 4 ते 5 दुकाने घटनास्थळीच सील केली आहेत. जप्त केलेल्या मालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असण्याची शक्यता असून, संबंधित दुकानदारांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गुजरातवरून होणाऱ्या तस्करीत 'टोलनाक्यांवर' फिल्डिंग
नालासोपारा आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये येणारा बहुतांश गुटखा हा गुजरात राज्याच्या सीमेवरून छुप्या मार्गाने वाहतूक केला जातो, अशी गोपनीय माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या पुरवठा साखळीचा कणा मोडण्यासाठी प्रशासनाने केवळ दुकानांवरच नाही, तर वाहतुकीवरही लक्ष केंद्रित केले आहे. गुजरातवरून येणाऱ्या मालवाहू वाहनांची कसून तपासणी करण्यासाठी आणि संभाव्य गुटखा तस्करी रोखण्यासाठी प्रमुख हायवे आणि टोलनाक्यांवर विशेष पाळत तैनात करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे नालासोपाऱ्यातील मुख्य चौकांमध्ये बेकायदेशीरपणे पानमसाला आणि गुटखा विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world