
संजय तिवारी, नागपूर
Nagpur News : बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्याचे मुख्य आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह एकूण पाच आरोपींना सशर्त जामीनावर सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असे या घोटाळ्याचे वर्णन केले जाते. नागपूरच्या सत्र न्यायालयाने नरड यांच्या सोबतच शिक्षण अधीक्षक निलेश मेश्राम, वरिष्ठ लिपीक सूरज नाईक, राजू मेश्राम आणि उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय बोदडकर यांना जामीन दिला आहे. मात्र, सशर्त जामिनाच्या अटी कळू शकलेल्या नाहीत. सत्र न्यायालयात बचाव पक्षातर्फे युक्तिवादात, पोलिस तपास बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने आरोपींना कोठडीत ठेवणे गरजेचे नाही, हा मुद्दा रेटण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे घोटाळा?
केवळ शिक्षण उपसंचालक यांना शालार्थ आयडी तयार करण्याचे अधिकार असताना नियमांचे उल्लंघन करून 580 बोगस शालार्थ आयडी करण्यात आले असल्याचे आढळून आले. या आयडीद्वारे अपात्र व्यक्तींना, अगदी अनिवार्य अनुभव नसला तरी, शिक्षक आणि मुख्याध्यापक पदाच्या नोकऱ्या दिल्या गेल्या. बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावे पडताळणी न करता पगाराच्या रकमा काढण्यात आल्याने राज्याच्या वित्तीय कोशाला कोट्यवधी रुपयांची मोठी हानी झाली असल्याचे समोर आले आहे. वर्ष 2019 पासून सुरू असलेला हा घोटाळा या वर्षी एप्रिल महिन्यात बाहेर आला.
आरोपींनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून अनुभव नसलेल्या पराग पुडके नावाच्या व्यक्तीचा, त्याला अगदी शिक्षक पदावर नेमणे शक्य नसताना बोगस कागदपत्रांच्या आधाराने मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले होते. हे प्रकरण लक्षात आणून दिल्या नंतर देखील उल्हास नरड यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता. ही नियुक्ती केल्याच्या आरोपावरून 12 एप्रिल रोजी मुख्य आरोपी उल्हास नरड यांना गडचिरोली येथून अटक करण्यात आली होती.
(नक्की वाचा - Operation Sindoor News: पाकिस्तानची खुमखुमी.. बॉर्डरवर सैन्याची जमवाजमव; संरक्षण मंत्रालयाचा मोठा खुलासा)
तपासात समोर आलेली बाब
तपासात आढळून आले की सह आरोपी निलेश मेश्राम याने पुडके याच्याकडून साडे दहा लाख रुपयांची रक्कम लाचेखातर स्वीकारली आणि त्यापैकी 20 हजार रुपये सूरज नाईक आणि 30 हजार रुपये संजय बोदडकर यांना दिले. उर्वरित दहा लाखांची लाच निलेश मेश्राम याने शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासोबत वाटून घेतली, असे तपासात समोर आले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम आणि उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक संजय बोदाडकर यांच्यावर पंधरा दिवसानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world