एन्काऊंटर स्पेशालिस्ट, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या दोन्ही मुलीदेखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. स्वीकृती शर्मा यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकृती शर्मा यांच्यासह त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांचेही शिवसेनेत स्वागत केले. सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, आमदार मनिषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच शिवसेना पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्वीकृती शर्मा या पीएस फाऊंडेशन नावाने एनजीओ चालवतात. या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असतात.
नक्की वाचा- राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार? जितेंद्र आव्हाड नवा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत
शिवसेना पक्षप्रवेशानंतर स्वीकृती शर्मा यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आमंत्रित केले, याबाबत त्यांचे आभार व्यक्त करते. आधी समाजकारण असते मग राजकारण असते. त्याचप्रमाणे आमच्या परिवारात आम्ही समाजकारण मागील 10 वर्षांपासून करत आहोत. याचाच परिणाम म्हणजे आज आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमंत्रित केले आणि आज आम्ही पक्षप्रवेश केला. यापुढे पक्ष जसा आदेश देईल तसे आम्ही काम करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेश देतील आम्ही त्याचे पालन करू."
(नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं असेल; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं)
प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेकडून लढवली होती निवडणूक
अँटिलिया प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा सध्या जामिनावर बाहेर आहेत. प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांचे पक्षात स्वागत केले होते. आता शिवसेनेत फूट पडली असून प्रदीप शर्मा यांचे कुटुंब शिंदे गटात सामील झाले आहे.
2019 मध्ये प्रदीप शर्मा यांनी नालासोपारा येथून शिवसेनेकडून विधानसभा निवडणूकही लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिसले. शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रचारात प्रदीप शर्मा दिसले होते. यावरुन ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका देखील केली होती.