विशाल पुजारी, कोल्हापूर
कोल्हापुरात एका कर्ज फसवणूक प्रकरणात मध्यस्थी करण मनसे नेत्यासह सात जणांना महागात पडल्याचं समोर आलं आहे. सात संशयित आरोपींनी क्रेडिट सोसायटीत घुसून मारहाण केल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सात जणांपैकी चौघांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापुरातील रंकाळा परिसरातील एका खासगी क्रेडिट सोसायटीतील कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. शुभम देशमुख असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (5 ऑगस्ट) सहा ते सात जणांनी मिळून खाजगी क्रेडिट सोसायटीच्या मॅनेजर सह कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सात जणांवर खंडणी, दरोडा आणि ॲट्रॉसिटी यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल केलेल्यांपैकी चौघांना मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, समर्थ कशाळकर, प्रसाद पाटील अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर इतर सर्वांचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
मनसे नेता राजू दिंडोर्ले
(नक्की वाचा - विशाळगड हिंसाचार प्रकरण; 17 जणांना जामीन मंजूर, तर 7 जणांचे जामीन फेटाळले)
मारहाण करण्याचं कारण काय?
रंकाळा येथील श्री साई दर्शन अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथे गेल्या दीड वर्षांपासून कर्ज प्रकरण पूर्ण करून देऊ, असा विश्वास स्थानिकांना दिला जात होता. या कामासाठी संबंधित व्यक्तीकडून कर्ज मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जात होते. पैसे दिलेल्या कोणालाही कर्ज मिळालं नाही. यासाठी संबंधित सर्व गुंतवणूकदारांनी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे मदत मागितली. यानंतर सोमवारी (5 ऑगस्ट) सायंकाळी मनसे जिल्हाध्यक्ष राजे दिंडोर्ले, प्रसाद पाटील, विकास कांबळे आणि समर्थ कशाळकर यांच्यासह अज्ञात तिघेजण यांनी एकत्रपणे पैसे उकळणाऱ्या खाजगी क्रेडिट सोसायटीवर धाड टाकली. संबंधित मॅनेजर आणि कर्मचारी अशा तिघा जणांना शिवीगाळ आणि अमानुषपणे मारहाण केली. या सर्व प्रकरणाची फिर्याद शुभम देशमुख या कर्मचाऱ्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.
(नक्की वाचा- 'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...')
लक्ष्मीपुरी परिसरात गुंतवणूकदार नागरिकांची गर्दी
लक्ष्मीपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर सर्व संशयित आरोपींवर गुन्हा नोंद केला. मंगळवारी (6 ऑगस्ट) सकाळी तिघा जणांना अटक केली. ही अटक झाल्यानंतर लक्ष्मीपुरी परिसरात गुंतवणूकदार नागरिकांनी गर्दी केली. अटक केलेल्या वरील सर्वांचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी देखील या सर्वांनी केली. अटकेतील तिघांना दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्ह्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापैकीच असलेल्या या प्रकरणाला मारहाणीमुळे वेगळ वळण प्राप्त झाला आहे. गुंतवणूकदार नागरिकांनी थेट पोलिसांची संपर्क साधण्याऐवजी स्थानिक लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करायला लावल्यामुळे या संपूर्ण घटनेत फसवणुकीचे प्रकरण लांब राहिला आहे.