मनोज सातवी, पालघर
Vasai News : वसई पूर्वेकडील नायगाव परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायगाव पूर्वेकडील नवकार इमारतीमध्ये एका ४ वर्षीय चिमुकलीचा इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्विका प्रजापती असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना अन्विकाच्या घराबाहेर घडली. अन्विकाला घराबाहेर जाताना चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवले होते. खेळता खेळता अन्विका तेथील खिडकीवर बसण्यासाठी गेली. मात्र, काही कळायच्या आतच तिचा तोल गेला आणि ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली पडली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेज पाहताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
धक्कादायक VIDEO
(नक्की वाचा- Jalgaon Crime: मित्राची मुलीवर वाईट नजर, आईचीही साथ! डोळ्यादेखत नको ते केलं, जळगावमधील घटना)
अन्विका इमारतीवरून खाली पडल्याचे लक्षात येताच, इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी वसई येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केले. परंतु, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने अन्विकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
(नक्की वाचा - Kalyan News: वाह रे अधिकारी! एकाच दिवशी KDMCचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात)
या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. नायगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. अन्विकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यामध्ये काही निष्काळजीपणा झाला आहे का, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा सखोल तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.