
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख 75 बसस्थानकावर सर्वसामान्य लोकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हे प्रत्यक्षात येणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. याचा थेट फायदा सर्व सामान्यांना होणार आहे. बसची वाट पाहात असताना त्यांना पुस्तक वाचनाचा आनंद यामुळे घेता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा एसटीच्या प्रमुख 75 बसस्थानकावर परिसरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी " मोफत वाचनालय " सुरू करणारं आहोत असं सरनाईक म्हणाले. या वाचनालयात मराठी भाषेतील वि.स. खांडेकर , वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), कवी नारायण सुर्वे, पु.ल. देशपांडे, यांच्या सारख्या प्रथितयश व लोकप्रिय साहित्यिक, कवी यांची पुस्तके, कविता संग्रह, नामदेवराव ढसाळ, भालचंद्र नेमाडे,शंकर पाटील, व.पु. काळे, विश्वास पाटील, या सारख्या कादंबरीकार यांच्या कादंबऱ्या सर्वसामान्यांसाठी या वाचनालयात ठेवण्यात येतील असंही ते म्हणाले.
नक्की वाचा - Maharashtra Public Transport News: एक QR Code वर मिळणार रेल्वे, मेट्रो, बसचे तिकीट
ही पुस्तके संबंधित बसस्थानकावरील एसटी कर्मचाऱ्यांकडे नोंद करून लोक आपल्या घरी वाचनास घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर वाचन करून परत आणून देऊ शकतात. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मौलिक संदर्भ ग्रंथ देखील या फिरत्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील. अर्थात, ही सर्व सेवा मोफत असणार आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रे देखील दररोजच्या दररोज उपलब्ध करून दिली जातील.
त्यामुळे मराठी भाषेचा समृद्ध वारसा चालवणारा "वाचन कट्टा " बसस्थानकाच्या परिसरात निर्माण होईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक विभागामार्फत लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारा " वाचन कट्टा " एसटीच्या बसस्थानकावर निर्माण करून अनमोल भेट या निमित्ताने जनतेला आम्ही देत आहोत असं सरनाईक म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world