घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जात सविस्तर आढावा घेतला. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

Advertisement
Read Time: 2 mins

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई आणि परिसरात अचानक आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे घाटकोपरच्या छेडा नगर येथील महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने अनेक वाहने होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकली. 

मिळालेल्या माहितीनुसार, होर्डिंग कोसळलं त्यावेळी पेट्रोल पंपावर अनेक वाहने होती. जवळपास 100 जण या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. आतापर्यंत 54 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना जवळील राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

नक्की वाचा- मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अचानक वातावरण का बदललं? काय आहे कारण...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जात सविस्तर आढावा घेतला. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. मदतकार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाकडून सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 

दोषींवर कडक कारवाई करणार- मुख्यमंत्री

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. बचावकार्य सध्या सुरु आहे. खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे हे सध्या प्राधान्य आहे. या होर्डिंगबाबत चौकशी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिली आहे. यामध्ये कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. यासोबतच मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या असून अशाप्रकारच्या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.   

Advertisement

(नक्की वाचा- Mumbai Weather: वादळी वारे, जोरदार पावसामुळे मुंबई विस्कळीत )

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारावर जो काही खर्च होईल तो शासनामार्फत केला जाईल. ज्या नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.  

मेट्रो 4 चे कर्मचारी मदतीला आले धावून

घाटकोपर छेडा नगर येथे होर्डिंग कोसळले तिथे मेट्रो 4 चे काम सुरु आहे. तेथे असलेले कर्मचारी या दुर्घटनेनंतर तातडीने मदतीला धावून गेले. मेट्रोकडे अवजड वस्तू उचलण्याची यंत्रणा असल्याने या कर्मचाऱ्यांनी हायड्रो क्रेन आणि गॅस कटर तेथे पाठवले. 

Advertisement

 पाहा VIDEO

Topics mentioned in this article