Gokhale bridge update : मुंबईतील अंधेरी हे एक महत्त्वाचं उपनगर आहे. अंधेरीतील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या कामाचा फियास्को झाल्यानं प्रशासनाला मोठी नामुश्की सहन करावी लागली होती. त्याचबरोबर या भागातील वाहतूक कोंडीमुळे सामान्य मुंबईकरांना रोज मनस्ताप सहन करावा लागत होता. मुंबईकरांना गुरुवारपासून या मनस्तापापासून दिलासा मिळणार आहे. अंधेरीतील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पुलादरम्यानची लेन जोडण्याबाबतची सर्व संरचनात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय. ही लेन गुरुवारी (4 जुलै) संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशतः उचलून तो गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग'चा वापर करून दोन्ही पूल जोडण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महापालिकेनं 78 दिवसांमध्ये पूर्ण केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबतच्या सर्व टेस्ट सकारात्मक आल्यानंतर वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेने (व्हिजेटीआय) महानगरपालिका प्रशासनास, या लेनवर वाहतूक सुरू करण्यास हरकत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र दिलं आहे. त्यानंतर वाहतूक व्यवस्थपानासंदर्भातील कामं आणि टेस्ट झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपासून जुहू दिशेने अंधेरी असा पश्चिम- पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी लेन वाहतुकीसाठी सुरु केली जाणार आहे.
हलक्या वाहनांनाच प्रवेश
गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Budget 2024 मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा )
बर्फीवाला पूल स्थिर
सी. डी. बर्फीवाला या पुलासाठी देण्यात आलेला तात्पुरत्या स्वरूपाचा जॅकचा आधार काढण्यात आला आहे. त्यामुळे बर्फीवाला पूल पूर्णपणे खांबांच्या आधारावर स्थित आणि सुस्थितीत असल्याची माहिती पूल विभागाने दिली आहे. तसेच पी 11 या खांबाच्या ठिकाणी पूल उचललेल्या ठिकाणी पुलास भक्कम आधार देण्यात आला आहे, याचाच अर्थ कोणताही तात्पुरता आधार पुलाला देण्यात आलेला नाही, असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.