
Grow Govinda in Mumbai : मुंबईच्या भारतीय क्रीडा मंडळाच्या स्टेडियमवर ग्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी या मैदानावर श्रीकृष्ण जन्माष्टमी पूर्वीच ढाकूम्माकुमचा आवाज ऐकायला मिळणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी शेकडो गोविंदा पथकाला संपूर्ण मुंबईत प्रवास करावा लागतो. त्यामुळे या गोविंदा पथकाला जन्माष्टमी पूर्वी बक्षिसाच्या माध्यमातून काही रक्कम मिळावी जेणेकरून जन्माष्टमीच्या दिवशी हे गोविंदा त्यांचं प्रवासाचं खानपानाचं नियोजन योग्यरीत्या करू शकतील यासाठी अनेक सराव शिबिरांचे आयोजन केले जाते.
याच सराव शिबिराला आराध्य ग्रुपच्या माध्यमातून एक वेगळ रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती आयोजक विजय तांडेल यांनी दिली. आतापर्यंत या ग्रो गोविंदा स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवलाय. या ठिकाणी येणाऱ्या गोविंदा पथकांची त्यांच्या थरानुसार वर्गवारी केली जाणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला त्यांनी लावलेल्या थरानुसार ठराविक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. ज्यामध्ये पाचव्या थरापासून ते आठव्या थरापर्यंतचा समावेश असणार आहे.
( नक्की वाचा : Dahi Handi : राजकारणात 'गोविंदा आला रे आला', ठाकरेंना सलामी, प्रो गोविंदामधून 'जय जवान'चा विषयच संपला! )
खरंतर देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाला यावेळी नियमानमुळे प्रो गोविंदा स्पर्धेत सहभाग घेता आला नाही. त्यामुळे ग्रो गोविंदाच्या आयोजकांनी जय जवान गोविंदा पथकाला या स्पर्धेमध्ये विशेष आमंत्रण दिलं आहे. या ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाच्या माध्यमातून विक्रम करण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे.
ग्रो गोविंदा स्पर्धेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. 'NDTV मराठी' या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर असणार आहे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एनडीटीव्ही मराठी चॅनलवर आणि त्यांच्या वेबसाईटवर केलं जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world