Heat Wave Alert News: निसर्गाचे बदलणारे चक्र आणि वाढते जागतिक तापमान यामुळे यंदाचा उन्हाळा सामान्यांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. राज्याच्या अनेक भागांत एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 2026 हे वर्ष भारताच्या हवामान इतिहासातील 'सर्वात उष्ण वर्ष' म्हणून नोंदवले जाण्याची भीती आहे. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ‘हीट वेव्ह'चा (उष्णतेची लाट) इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
'सुपर अल निनो' म्हणजे काय? | Super El Nino 2026 Impact
जागतिक हवामान बदलामध्ये ‘सुपर अल निनो' ही घटना यंदा कळीची भूमिका बजावत आहे. समुद्र सपाटीचे तापमान प्रचंड वाढल्यामुळे जागतिक स्तरावर हवामानाचे संतुलन बिघडले आहे. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होण्याची चिन्हे असून उन्हाळ्याची तीव्रता कमालीची वाढणार आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंश डिग्री सेल्सिअसच्या वर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेची व्याख्या (IMD मानक) | Heat Wave Alert In Maharashtra
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नियमानुसार, किनारी प्रदेशात सलग दोन दिवस तापमान 37 अंश डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यास उष्णतेची लाट मानली जाते. जर तापमान सरासरीपेक्षा 4.5° ते 6.4° ने वाढले तर ती 'उष्णतेची लाट' असते, तर 6.5° पेक्षा जास्त वाढ झाल्यास ती 'अतिउष्ण लाट' (Severe Heat Wave) मानली जाते, जी मानवी जीवनासाठी अत्यंत धोकादायक आणि जीवघेणी आहे.
उष्माघाताची लक्षणे ओळखा आणि वेळीच सावधगिरी बाळगा | Heat Wave Precautionsउष्माघात ही केवळ थकव्याची अवस्था नसून ती एक वैद्यकीय आणीबाणी आहे. शरीराचे तापमान वाढूनही घाम न येणे, चक्कर येणे, मळमळणे, त्वचा लाल होणे आणि तीव्र तहान लागणे ही धोक्याची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(नक्की वाचा: Nautapa 2026: 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, घराबाहेर पडावं की पडू नये? दुर्लक्ष करू नका वाचा माहिती)
उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना | Heat Wave Symptoms
1. पाण्याचे नियोजन: तहान नसली तरी दिवसातून ३-४ लिटर पाणी प्या. ताक, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी यांसारख्या पेयांचा समावेश करा.
2. पोशाख: घराबाहेर पडताना सुती, सैल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर अनिवार्य करा.
3. वेळेचे भान: शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा.
4. आहार: उन्हाळ्यात पचायला जड असणारे मांसाहार आणि हाय-प्रोटीन आहार कमी करावा. शिळे अन्न आणि कॅफिनयुक्त पेये (चहा, कॉफी) टाळावी.
5. घराचे व्यवस्थापन : दुपारच्या वेळी खिडक्यांना पडदे लावून ठेवा. रात्री हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.
(नक्की वाचा: Aloe Vera Detox Drink : उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी कसे तयार करावे अॅलोव्हेरा ड्रिंक? वाचा सोपी पद्धत)
सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी
- या संकटकाळात केवळ स्वतःचेच नाही तर मुक्या प्राण्यांचेही रक्षण करा.
- गॅलरीत किंवा घराबाहेर पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा.
- हे संकट केवळ नैसर्गिक नसून वाढती जंगलतोड आणि औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे, त्यामुळे पर्यावरण रक्षण हेच यावर कायमस्वरूपी उत्तर आहे.
- कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 108 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
(Content Source : महासंवाद वेबसाइट)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world