दिवाळीआधी सचिन वाझेला हायकोर्टाचा दिलासा, एका प्रकरणात जामीन मंजूर

एका प्रकरणात जामीन मिळाला असला तरी अद्यापही सचिन वाझेला तुरुंगातच राहावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस.सोनक व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी दुपारी या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यानंतर खंडपीठाने हा निर्णय दिला.

जाहिरात
Read Time: 3 mins

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या कथित खंडणी प्रकरणी तुरुंगात असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी अडकलेल्या इतर सर्वांना जामीन मंजूर झाला होता. याच प्रकरणात तो माफीचा साक्षीदार देखील झाला होता. त्यामुळे मलाही जामीन मंजूर करा, अशी याचिका वाझेने उच्च न्यायालयात दाखल केली होती. 

या प्रकरणात न्यायालयाने सचिन वाझेला अखेर दिलासा दिला आसून मनसुख हिरेन हत्या आणि अँटेलिया येथे सापडलेल्या वाहनातील जिलेटिन प्रकरणात मात्र त्याची सुटका झालेली नाही. त्यामुळे एका प्रकरणात जामीन मिळाला असला तरी अद्यापही सचिन वाझेला तुरुंगातच राहावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस.सोनक व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी दुपारी या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यानंतर खंडपीठाने हा निर्णय दिला.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सचिन वाझेच्या याचिकेवरील सुनावणी निश्चित करण्यासाठी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर आले होते. त्यामध्ये वाझेतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर स्पष्टतेसाठी मुंबई उच्च न्यायालयाने देशाच्या अॅटर्नी जनरलना नोटीस बजावली होती. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना जामीन मिळाला असल्याने आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी वाझेने याचिकेद्वारे केली होती.

(नक्की वाचा-  डायरी ऑफ होम मिनिस्टर! अनिल देशमुखांचे पुस्तक तयार, दिवाळीत आरोपांचा सुतळी बॉम्ब फुटणार)
 
आपली अटक बेकायदेशीर असल्याने तत्काळ आपली मुक्तता करावी, अशी मागणी सचिन वाझेने केली आहे. या प्रकरणात वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आल्याने त्याला जामीन द्यावा, अशी मागणी वाझेच्या वकिलांनी केली. तर वाझेने अद्याप साक्ष दिलेली नसल्याने त्याला जामीन दिला जाऊ नये, अशी मागणी सरकारतर्फे करण्यात आली आहे.  

पुढील सुनावणी 22 ऑक्टोबरला 

सीआरपीसीच्या कलम 306 (4) (b) च्या संवैधानिक वैधतेला सचिन वाझे याने या याचिकेद्वारे आव्हान दिले होते. त्यामुळे हे प्रकरण देशाच्या अॅटॉर्नी जनरल यांनी पहावे असे न्यायालयातर्फे सांगण्यात आले. त्यानुसार  देशाच्या ऍटर्नी जनरल यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. या प्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती मात्र अॅटॉर्नी जनरल यांना 11 ऑक्टोबर रोजी काही महत्त्वाची कामे असल्याचे सांगत केंद्राकडून 22 ऑक्टोबरची तारीख मागण्यात आली होती. त्यानुसार आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर म्हणजेच अँटेलियासमोर जिलेटिनने भरलेली गाडी सचिन वाझे याच्या सांगण्यावरून ठेवण्यात आल्याचे समोर आले होते. यामध्ये वाजे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे देखील समोर आले. इतकेच नव्हे तर ज्याची गाडी होती त्या हिरेन मनसुख यांची हत्या देखील करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात अद्यापही त्यांची सुटका झालेली नाही. 

(नक्की वाचा: काँग्रेसच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला? 'या' दिवशी नावं जाहीर होणार)

कोण आहे सचिन वाझे?

सचिन वाजे एकेकाळी मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जात होता. 2 डिसेंबर 2002 मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी सचिन वाझेला निलंबित करण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.

Topics mentioned in this article