विशाल पाटील, मुंबई
शैक्षणिक अभ्यासक्रमात पहिलीपाहून हिंदी सक्तीविरोधात शिवसेना आणि मनसेने प्रचंड आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला शासन निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. मराठी विजय झाल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली. मात्र मुंबईतील महापालिका शाळांचा विचार केला तर परिस्थिती वेगळी आहे. मुंबईत महापालिका शाळांच्या माध्यमांबाबत एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे, ज्यातून शैक्षणिक बदल अधोरेखित होतो आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे, तर मराठी माध्यम शाळांची संख्या जास्त असूनही विद्यार्थीसंख्या कमी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मुंबई महापालिकेत मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या २६२ आहे, परंतु या शाळांमध्ये ३३ हजार ७२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
(नक्की वाचा- Ajit Pawar : अजित पवारांचे सासरवाडीत बॅनर्स, धाराशिवमधील बॅनर्सची राज्यभर चर्चा)
याउलट, हिंदी माध्यमाच्या शाळांची संख्या २२० आहे, जी मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा ४२ ने कमी आहे. असे असूनही, हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या ६७ हजार ४१७ इतकी प्रचंड आहे. याचा अर्थ हिंदी माध्यमाच्या शाळा मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा संख्येने कमी असूनही, त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.
या आकडेवारीतून हे स्पष्ट होते की, मुंबई महापालिकांच्या शाळेत हिंदी माध्यमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे मुंबईत स्थानिक भाषेशिवाय इतर भाषिक माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसतो आहे. परराज्यातून आलेल्या हिंदी भाषिकांची संख्या देखील यातून अधोरिखित होते. तर विविध इंग्रजी माध्यमाच्या १४९ शाळा असून त्यात विद्यार्थी संख्या ८८ हजार २९५ एवढी आहे.
उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक
केवळ हिंदीच नाही, तर मुंबईतील उर्दू माध्यमाच्या शाळांची स्थितीही मराठी शाळांपेक्षा अधिक चांगली असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मुंबईत १८८ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत आणि या शाळांमध्ये ६४ हजार ३९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमांपेक्षा कमी असली तरी, विद्यार्थ्यांची संख्या मराठी माध्यमापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ही आकडेवारी मुंबईतील शिक्षण क्षेत्रातील नवीन ट्रेंड दर्शवते. मात्र या सर्व बाबींचा विचार करून भविष्यात मुंबईतील शिक्षणासाठी काय उपाययोजना केल्या जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.