दिनेश कुलकर्णी, प्रतिनिधी
हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता गावात पिकअप ट्रक घेण्यासाठी माहेराहून 7 लाख रुपये आणण्यावरून 22 वर्षीय विवाहीत महिलेला विजेचा शॉक देऊन खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात मृत महिलेच्या सासरकडील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली तालुक्यातील संतुकपिंपरी येथील शेख अब्दुल शेख मदार यांची मुलगी नाजीयाबी हिचा विवाह 4 वर्षांपूर्वी पळसोना तालुका हिंगोली येथील शेख हुसेन उर्फ न्यामत पिता शेख अहेमद यांच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस नजियाबीचा पती आणि तिच्या सासरच्या मंडळींनी नाजियाबी हिला चांगली वागणूक दिली. पण काहीकाळानंतर सासरची मंडळी नाजीयाबीला त्रास देऊ लागले. माहेराहून पैसे आणण्याच्या कारणावरून तिचा नेहमी छळ केला जात होता. त्यानंतर नाजीयाबी व तिचे पती शेख हुसेन हे लिंबाळा येथे राहण्यासाठी आले होते. पण त्यानंतरही पतीकडून आणि सासरकडील मंडळींकडून तिचा छळ सुरूच होता.
दरम्यान पिकअप ट्रक खरेदी करण्यासाठी माहेरावरून 7 लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून तिचा छळ केला जाऊ लागला होता. मात्र माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना माहेराहून पैसे आणणे शक्य नव्हते. मात्र नाजायाबी पैसे आणत नसल्याने शनिवारी सासरच्या मंडळींनी तिला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे.
नक्की वाचा - विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली 15 वर्षीय मुलगी बुडाली, पुण्याच्या इंदापुरातील घटना
याप्रकरणी शेख अब्दुल शेख मदार यांनी रविवारी उशीरा हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी शेख हुसेन उर्फ न्यामत शेख, अहमद शेख, इरफान शेख, अहमद शेख, हमीद शेख चाँद व अन्य राहणार पळसोना तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश दळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड उपनिरीक्षक संतोष मोकळे पुढील तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world