
पुणे शहरातील हिंजवडी भागाचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. आयटी शहर म्हणून पुण्याला ओळख करुन देण्यात हिंजवडीचा महत्त्वाचा वाटा आहे. या भागातील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष पुढाकार घेतला आहे. त्याची कार्यवाही आता सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही सुरू झाली असून परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दर 15 दिवसांनी नियमित आढावा घेण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हिंजवडी परिसरातील नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज (22 जुलै) संवाद साधला. यावेळी उपस्थित प्रतिनिधिंनी तातडीने सुरू झालेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी ही कार्यवाही सातत्याने सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावीत अशाही सूचना त्यांनी दिल्या.
(नक्की वाचा : Pune News: 7 महिन्यांनी पुन्हा EVM उघडणार! 2 मतदारसंघात होणार पडताळणी! काय आहे कारण? )
काही यंत्रणांकडून कामांमध्ये दुर्लक्ष होऊन रस्त्याच्या दुरूस्तीची कामे जर वेळेत पूर्ण केली नाहीत तर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. हिंजवडी परिसरातील नागरिक संघाच्या प्रतिनिधिंसोबत एक व्हॉट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व यंत्रणांचे प्रतिनिधीदेखील असतील. या प्लॅटफॉर्मवर त्यांना सर्व प्रश्न उपस्थित करता येतील आणि ते प्रश्न तातडीने सोडवले जातील, असेही निश्चित करण्यात आले आहे.