- विलेपार्लेतील नरसी मोनजी कॉलेजच्या प्रोफेसरची हत्या
- आरोपी हा मजूर काम करणारा आहे
- शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आलोक यांचा खून
विलेपार्ले येथील प्रतिष्ठित नरसी मोनजी कॉलेजमधील एका (33 वर्ष) तरुण प्राध्यापकाची किरकोळ वादातून भर स्थानकात धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. आलोक कुमार सिंह (Alok Kumar Singh Narsee Monjee College of Commerce and Economics Professor) असे या मृत प्राध्यापकाचे नाव असून, याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी (GRP) अवघ्या काही तासांत आरोपी अमोल एकनाथ शिंदे (27) याला मुंबईच्या कुरार भागातून अटक केली आहे.
नक्की वाचा: लोकलमधून उतरण्यावरून वाद, प्राध्यापकाची हत्या, CCTVमध्ये दिसला आरोपी; पाहा Video
लोकलमधून उतरण्यावरून वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास मालाड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडली. आलोक कुमार सिंह हे नेहमीप्रमाणे कॉलेज संपवून घरी जाण्यासाठी बोरिवलीला जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होते. मालाड स्थानकात गाडी आल्यानंतर उतरत असताना त्यांचा आरोपी अमोल शिंदे याच्याशी वाद झाला. वाद नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संतापलेल्या अमोल शिंदे याने आपल्या जवळील एक धारदार वस्तू काढली आणि सिंह यांच्यावर वार केले. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की सिंह यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. हल्ला केल्यानंतर अमोल शिंदे पळून गेला आणि इतर प्रवासी मदत करायच्या आधीच अमोल सिंह हे लोकल ट्रेनमध्ये कोसळले. स्थानकावरील गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेत आरोपी शिंदे तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.
अमोल शिंदेला पोलिसांनी कसा शोधला?
घटनेची माहिती मिळताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी धाव घेतली. सिंह यांना तातडीने कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना 'ब्रॉट डेड' (दाखल करण्यापूर्वीच मृत) घोषित केले. ऐन संध्याकाळच्या वेळी गर्दीने गजबजलेल्या स्थानकावर ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी मालाड स्थानकावरील आणि त्याआधीच्या स्थानकांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरूवात केली. एका फुटेजमध्ये पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घातलेला अमोल शिंदे हा घाईघाईने फूट ओव्हर ब्रिजवरून (FOB) बाहेर पळताना दिसला. पोलिसांनी काही प्रत्यक्षदर्शी आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीची शहानिशा केली आणि आरोपीची ओळख पटवली, यानंतर खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी रविवारी पहाटे मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. शिंदे हा बेठबिगारी कामगार असून तो धातू पॉलिश करण्याचे काम करतो.
नक्की वाचा: मुंबईत चाललंय काय? लोकलमध्ये प्राध्यापकाला संपवलं; ट्रेनमधून उतरताना वाद अन्...
शांत स्वभावाच्या प्राध्यापकाचा मृत्यू
आलोक कुमार सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशातील होते आणि सध्या मालाड पूर्व परिसरात आपल्या पत्नीसोबत राहत होते. 2024 पासून ते नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (NM College) मध्ये कनिष्ठ महाविद्यालयात गणित आणि सांख्यिकी (Mathematics and Statistics) विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक हे अत्यंत शांत संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. एका शांत स्वभावाच्या शिक्षकाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण कॉलेज कॅम्पस आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world