मुंबई उपनगर रेल्वे सेवेतील एस्केलेटर हे प्रवाश्यांच्या सुविधेसाठी बसविण्यात आले असले तरी नेहमीच यात बिघाड असतो. एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे 1.85 लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करते, अशी माहिती आता उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती विचारली होती. त्यावर रेल्वे प्रशासनानं हे उत्तर दिलंय.
पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता शकील अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते विरार या दरम्यान 106 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 1.85 लाख आहे. तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एच एस सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसटीएम ते कल्याण आणि सीएसटीएम ते वाशी या दरम्यान 101 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 2.97 लाख आहे,' असं गलगली यांनी स्पष्ट केलं.
1825 वेळा बंद पडते एस्केलेटर
एका वर्षात 1825 वेळा एक्सेलेटर बंद पडते, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिलीय. यामधील 95 टक्के आपत्कालीन बटन अज्ञात व्यक्तीकडून बंद केल्याने एस्केलेटर बंद होते. तर मध्य रेल्वेच्या एच एस सूद यांनी बंद एस्केलेटरची माहिती जतन न केल्याची कबूली दिली आहे.विशेष दिवशी बंद असलेल्या एस्केलेटर माहिती विचारली तर ती दिली जाऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.
अनिल गलगली यांनी मुंबईतील 2 रेल्वे अंतर्गत एस्केलेटर बाबत खर्चातील 1.12 लाखांच्या तफावतीवर आश्चर्य व्यक्त केले. यामुळे मध्य रेल्वेला वर्षाला 1.13 कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशीची मागणी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुविधासाठी बसविण्यात आलेले एस्केलेटर गर्दीच्या अधिकांश वेळी बंद असल्याने प्रवाश्यांना दुविधांचा सामना करावा लागतो, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.