वादग्रस्त परिविक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर (IAS officer Pooja Khedkar) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा परिक्षणाचा कालावधी स्थगित करण्यात आला असून त्यांना 23 जुलैपर्यंत लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान पूजा खेडकर यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना निवेदन सादर केलं आहे. या निवेदनातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी दालन बळकावले नसून त्यांनीच माझी व्यवस्था त्या दालनात केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीने माझी उद्दाम अधिकारी म्हणून जनमानसात प्रतिमा निर्माण झाल्याने मला मानसिक त्रास होत आहे, असंही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
निवेदन कोणाला ?
विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रातून या बाबी समोर आल्या आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिवांनी विभागीय आयुक्तांना दिवसे यांचा अहवाल आणि खेडकर यांचे निवेदन याची इंग्रजी प्रत गुरुवारपर्यंत राज्य सरकारला देण्याचे निर्देश दिले आहेत. पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर अवास्तव मागण्या केल्याचा अहवाल दिवसे यांनी पाठवला होता. त्यावर पूजा खेडकर यांच्याकडूनही खुलासा मागविण्यात आला होता. खेडकर यांनी दिलेल्या खुलाशात त्यांनी दिवसे यांच्यावर त्यांनी सामान्य प्रशासन अवमानकारक वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. हे सर्व गैरसमजातून झाले असून हा मुद्दा मोठा केल्याने माझी प्रतिमा मलीन झाली आहे, असा खुलासा त्यांनी या पत्रातून केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिवसे यांचा अहवाल तसेच पूजा खेडकर यांचे निवेदन इंग्रजीत भाषांतर करून सामान्य प्रशासन विभागाला गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नक्की वाचा - IAS पूजा खेडकरांना दणका, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली मोठी कारवाई
पूजा खेडकर यांचे निवेदन
रुजू होण्याचा दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत विचारणा केली. त्यावर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था नसते असे सांगितले. यशदाच्या संचालकांकडे प्रशिक्षणाचे रिपोर्टिंग करायचे असल्याने ही बाब मी त्यांच्या कानावर घातली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून बसण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला बसण्यासाठी दोन जागा दाखवल्या. त्यापैकी एका दालनाला जोडून वॉशरूम नसल्याने मी ते नाकारले. दुसरी जागा चौथ्या मजल्यावरील खणीकर्म विभागाच्या स्टोअरमध्ये असलेली एक खोली दाखवली. ती मी मान्य केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे सांगितले. त्याचवेळी माझे वडील माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. मी त्यांना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांशी ओळख करून देण्यासाठी त्यांच्याकडे घेऊन गेले. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची बसण्याची व्यवस्था झाली का अशी विचारणा केली, त्यावर मी चौथ्या मजल्यावरील स्टोअरमध्ये असलेल्या खोलीत व्यवस्था झाल्याचे सांगितले. त्यावर तुम्ही आयएएस अधिकारी आहात. तुम्ही माझे खासगी दालन वापरा असे सांगून शिपायाला सर्व व्यवस्था करण्यास सांगितले. बाहेर बोर्डही लावा असेही संबंधितांना सांगितले. दुसऱ्या दिवशी माझे प्रशिक्षक आयुक्त कार्यालयात असल्याने त्या ठिकाणी गेले. त्याच दिवशी जिल्हाधिकारी तीन ते दिवसांच्या रजेनंतर परतले. हे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी दालन वापरत असल्याने राग त्यांना आला असावा. त्यांनी तहसीलदाराला बोलून टेबल आणि खुर्चा बाहेर काढण्यास सांगितले. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकून घेतलं नाही. मी जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी दालन जबरदस्तीने घेतले असेही म्हणाले नाही. मी त्यांची माफी मागितल्यानंतर त्यांनी माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत कसा उद्दामपणा केला याबाबत तक्रार केली.