जाहिरात

Nagpur News: रात्रभर धिंगाणा, सकाळी कारवाई! IIM विद्यार्थिनींच्या पालकांना फोन गेल्याने कॅम्पसमध्ये खळबळ

IIM Nagpur News : नागपूरमधील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएममध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Nagpur News:  रात्रभर धिंगाणा, सकाळी कारवाई! IIM विद्यार्थिनींच्या पालकांना फोन गेल्याने कॅम्पसमध्ये खळबळ
IIM Nagpur : या निर्णयामुळे कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपूर:

IIM Nagpur News : नागपूरमधील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएममध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संस्थेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रिसॉर्टवर पार्टी करायला गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाने दणका दिला आहे. शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत आयआयएम नागपूरने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना चक्क परीक्षेत बसण्यापासून रोखले आहे.

या निर्णयामुळे कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध मूक निदर्शने करत आपला निषेध नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण शनिवार 14 फेब्रुवारी रोजी घडले. आयआयएम नागपूरमधील एमबीए अभ्यासक्रमाचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे सुमारे 70 ते 75 विद्यार्थी एका रिसॉर्टवर पूल पार्टीसाठी गेले होते. ही पार्टी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी म्हणजेच सेंड ऑफ देण्यासाठी विविध विद्यार्थी क्लब्सनी आयोजित केली होती. 

विद्यार्थी रात्रभर रिसॉर्टवर थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते संस्थेत परतले, तेव्हा त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. नियमांचे उल्लंघन करून रात्रभर बाहेर राहिल्यामुळे प्रशासनाने या विद्यार्थ्यांवर कडक पवित्रा घेतला आहे.

( नक्की वाचा : Vidarbha Railway News : विदर्भातील रेल्वे प्रवाशांचे स्वप्न साकार; एका निर्णयाने बदलणार रेल्वे प्रवासाचे चित्र )

परीक्षेवर टांगती तलवार आणि विद्यार्थ्यांचा संताप

सोमवारी रात्री आयआयएम प्रशासनाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळवले की, शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना मिड-टर्म परीक्षा देता येणार नाही. ही परीक्षा मंगळवार 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. दुसरीकडे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेला बसू न दिल्यास करिअरचे मोठे नुकसान होईल, या भीतीने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही वर्षांच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनी एकत्र येत संस्थेच्या आवारात मूक निदर्शने केली आणि परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. अखेर प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पालकांना फोन केल्याने नवा वाद

या प्रकरणात प्रशासनाने केवळ विद्यार्थ्यांवर कारवाई करून थांबले नाही, तर पार्टीत सहभागी असलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना फोन करून याची माहिती दिली. तुमच्या मुलींनी संस्थेचे नियम मोडले असून त्या रात्रभर बाहेर होत्या, असे पालकांना सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या या पद्धतीवर विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 

केवळ विद्यार्थिनींच्याच पालकांना फोन का करण्यात आला आणि मुलांच्या पालकांना का नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. हा भेदभाव असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

( नक्की वाचा : Dink and Drive: ड्रिंक अँड ड्राईव्ह केलं तर तुमची बस जागेवरच जाम होणार; सरकारने शोधला जालीम उपाय, वाचा सविस्तर )

संस्थेचे नियम काय?

आयआयएमच्या नियमांनुसार, सर्व विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच राहावे लागते. रात्री 10 नंतर बाहेर जाण्यास मनाई आहे आणि कोणत्याही कारणास्तव बाहेर जायचे असल्यास संस्थेला पूर्वकल्पना देणे अनिवार्य असते. संबंधित विद्यार्थ्यांनी रजिस्टरमध्ये आपण घरी जात असल्याची नोंद केली होती, मात्र ते प्रत्यक्षात रिसॉर्टवर गेले होते.

 या चुकीच्या माहितीमुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांना पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काही काळासाठी निलंबनाची टांगती तलवारही विद्यार्थ्यांवर आहे.

भविष्यात पुन्हा परीक्षेची संधी

आयआयएम नागपूरने या वादावर स्पष्टीकरण दिले आहे की, ही कारवाई केवळ विनापरवानगी पार्टीला गेलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवरच करण्यात आली आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार करून त्यांना परीक्षेत बसू दिले जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी रीतसर परवानगी घेतली होती, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 

प्रथम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली आहे, त्यांची मिड-टर्म परीक्षा भविष्यात पुन्हा घेतली जाईल, असे आश्वासनही संस्थेने दिले आहे. संस्थेची शिस्त राखण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी ही कठोर पावले उचलणे आवश्यक होते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com