Nagpur News: काही मिनिटांत ऑनलाईन ऑर्डर पोहोचवण्याची जीवघेणी स्पर्धा आता डिलिव्हरी कंपन्यांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती थेट कर्मचाऱ्यांच्या थेट जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीतील चांगला परफॉर्मन्स आणि वेळेवर डिलिव्हरी केल्यामुळे निर्माण झालेली उत्तम प्रतिमा एका डिलिव्हरी बॉयसाठी थेट मृत्यूचा सापळा ठरली. आपल्याच सहकाऱ्याच्या प्रगतीवर जळणाऱ्या दोन डिलिव्हरी बॉयनी त्याचा रस्ता अडवून त्याच्यावर चाकूने थरारक हल्ला केला.
काय आहे प्रकरण?
नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी महामंडळ क्वार्टरसमोर उशिरा रात्री ही भीषण घटना घडली. ऊंटखाना भागात राहणारा 34 वर्षीय आमीन मुस्तफा पठाण हा ब्लिंकइट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो प्रत्येक ऑर्डर वेळेत पूर्ण करत असल्यामुळे कंपनीत त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून त्याच्यासोबतच काम करणारे 20 वर्षीय केतन उरकुडे आणि 20 वर्षीय श्रवण बारई हे दोघे त्याच्याशी सतत वाद घालत होते.
रविवारी सकाळी दोन्ही आरोपींनी आमीनसोबत वाद घालून त्याला जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. त्यानंतर रात्रीच्या वेळी आमीन जेव्हा मॉडेल मिल चौकात डिलिव्हरी देऊन कंपनीत परतत होता, तेव्हा दोन्ही आरोपींनी त्याचा पाठलाग केला. एसटी महामंडळाच्या क्वार्टरजवळ पोहोचताच आरोपींनी त्याची बाईक अडवली आणि काही समजण्याच्या आतच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.
( नक्की वाचा : Nagpur News : देवाला हात जोडला, प्रदक्षिणा मारली अन्...नागपुरात 65 वर्षांच्या चोराचा मंदिरात भलताच कारनामा )
दोन्ही आरोपींना अटक
अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात आमीन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरात मोठी घबराट पसरली आणि दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पुढाकार घेत जखमी आमीनला शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
( नक्की वाचा : Nagpur News : आता रात्रीही होणार सौरऊर्जा निर्मिती! नागपूरच्या संशोधकांचा विज्ञानाच्या विश्वात क्रांतिकारी शोध )
घटनास्थळी धाव घेत गणेशपेठ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून अवघ्या काही तासांतच केतन उरकुडे आणि श्रवण बारई या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. व्यावसायिक स्पर्धेव्यतिरिक्त या हल्ल्यामागे इतर काही वैयक्तिक वाद आहे का, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world