सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अखेर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे.
शिवसेनेकडून काही जागांसाठी प्रस्ताव आला होता. त्यातील बहुतांश जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, शिवसेनेसोबत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे. हिंदुत्ववादी विचारांचे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.
(नक्की वाचा- Palghar News : भाजपच्या विजयी नगरसेवकांच्या मिरवणुकीदरम्यान दोन महिलांना मारहाण; दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू)
सुरुवातीला भाजपने स्वबळाचा नारा दिला होता, मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने शिवसेनेशी हातमिळवणी करणे पसंत केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक असलेल्या राष्ट्रवादीला यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
भाजप-शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी
आता शहरात 'भाजप-शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी' असा थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान याबाबत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही या युतीला दुजोरा दिला आहे. भाजपसोबत जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच आम्ही युतीची अधिकृत घोषणा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या समीकरणामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.