देवा राखुंडे
इंदापूर मधील कृषी महोत्सवामध्ये दौंड तालुक्यातील सोन्या आणि मोन्या या एक कोटी रुपये किमतीच्या बैल जोडीने सर्वांचं लक्ष वेधले आहे. सोन्या-मोन्या चे मालक संतोष कोकणे यांनी आदेश देतात हे काजळी खिलार जातीची बैल समोरच्या पाहुण्याचा मुका घेतात. यामुळेच हे राज्यात नव्हे तर देशभरात चर्चेत आले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नंदादेवी गावच्या संतोष कोकणे यांचे सोन्या आणि मोन्या हे आता केवळ पुणे जिल्हा पुरते प्रसिद्ध राहिले नाहीत. त्यांची चर्चा देशभर रंगली आहे. मुळात काजळी खिलार जातीचे हे बैल त्यांच्या भरगच्च धिप्पाड उंच अशा शरीरामुळे आणि देखण्या रूपामुळे प्रसिद्ध आहेत.पण विशेष म्हणजे मालकाने आदेश देताच समोरच्या पाहुण्याचा मुका घेणारे हे बैल म्हणून आता ते सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
संतोष कोकणे यांनी मामा-भाच्याची असणारी ही जोड बाजारातून विकत आणली होती. त्यावेळी त्यांचं वय अतिशय लहान होतं. कोकणे कुटुंबाने या मामा भाच्यांना कुटुंबातील सदस्यच मानलं. पोटच्या लेकराप्रमाणे त्यांना वाढवलं. आता हेच सोन्या आणि मोन्या संतोष कोकणे यांचा जीव की प्राण बनलेत आहेत. त्याला कारण आहे संतोष कोकणे आणि सोन्या मोन्या यांचं घट्ट असं मैत्रीचं नातं. दररोज सकाळी उठल्यानंतर संतोष कोकणे यांचा आणि सोन्या मोन्याच्या जोडीचा दिनक्रम सुरू होतो.
झोपेतून उठलं की शेण झालवट केली की संतोष कोकणे सोन्या आणि मोन्याला जवळपास दोन किलोमीटरचा मॉर्निंग वॉक करून आणतात. याचं कारण की सोन्या आणि मोन्याची प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी ते हे करतात. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर सोन्या आणि मोन्याला विशेष करून कडुलिंबाच्या पाल्याचा रस दिला जातो. यामुळे रोगराई पासून सोन्या आणि मोन्याचं संरक्षण होतं. असं संतोष कोकणे सांगतात. दैनंदिन खुराकासोबत आवश्यक तो चारा आणि विशेष करून उसाची कांडी त्यांना खायला दिली जाते. यामधून शरीरातील आवश्यक असणारी कॅल्शियमची कमी भरून निघते. एकूणच त्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याने या मामा-भाच्याची जोड अगदी दणकेबाज झाली आहे.
धिप्पाड शरीर, उंचच्या उंच बांधा आणि काजळी खिलार जात, अतिशय चपळ असणारे हे बैल पाहता क्षणीच कोणालाही हवेहवेसे वाटतात. त्यामुळे सोन्या आणि मोन्याची किंमत बाजारात तब्बल एक कोटी रुपये आहे. अनेकांनी या किंमतीत ही जोडी मागितली होती. असं ही संतोष कोकणे सांगतात. मात्र सोन्या आणि मोन्या यांच्यासोबत बाप मुलाचं नातं आहे. त्यामुळे त्यांना विकायचं नाही असंही कोकणे यांनी स्पष्ट केलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या रथासाठी सोन्या आणि मोन्याला मागणी आली होती, असं ही ते सांगतात. राज्यात विविध ठिकाणी कृषी प्रदर्शने भरवली जातात. यातून कृषी क्षेत्रातील क्रांती आणि नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याला अवगत व्हावं असा उद्देश असतो. प्रामुख्याने यामध्ये पशुंसाठी विशेष प्रदर्शन भरवलं जातं. या प्रदर्शनात सोन्या आणि मोन्या सहभाग घेतात. 2023 पासून आतापर्यंत 20 हून अधिक कृषी प्रदर्शन सोन्या आणि मोन्याने गाजवली आहे. शिवाय लाखोंची बक्षीसही मिळवली आहेत.
पुण्याच्या इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कडून कृषी महोत्सव 2025 आयोजन करण्यात आलं आहे. याचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी अगदी बारकाईने कृषी महोत्सवात सहभागी झालेल्या पशुधनाची माहिती घेतली. यावेळी माणिकराव कोकाटे यांची नजर सोन्या आणि मोन्यावरती पडली. माणिकराव कोकाटे यांसोबतच असणाऱ्या क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी माणिकराव कोकाटे यांना सोन्या आणि मोन्याच्या कलेबद्दल सांगितलं. बैलाच्या मालकाने माणिकराव कोकाटे यांचा मुका घे म्हणताच बैलांनं माणिकराव कोकाटे यांचा मुका घेतला. हे पाहून माणिकराव कोकाटे ही चकित झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world