Shirdi News: शिर्डीत 'या' तारखेला देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन, हजारो तरुणांना मिळणार रोजगार

शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या तोफगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Arillery Bomb Ammunition Project In Shirdi

सुनिल दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News Today : देशाच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि ऐतिहासिक नोंद होण्याची तयारी सुरू झाली आहे. शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या तोफगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमामुळे शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रीय संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याचे चित्र आहे.

या प्रकल्पात 155 मिलीमीटर क्षमतेचे अत्याधुनिक तोफगोळे तयार करण्यात येणार असून,प्रतिवर्षी तब्बल पाच लाख तोफगोळे उत्पादन करण्याची क्षमता या कारखान्याची असणार आहे.खासगी क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर तोफगोळा उत्पादन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प मानला जात आहे.विशेष म्हणजे या प्रकल्पात वापरण्यात येणारे उत्पादन तंत्रज्ञान,प्रक्रिया आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत',‘मेक इन इंडिया'आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड'या संकल्पनांना मोठे बळ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

ग्लोब फोर्ज लिमिटेड कंपनीकडून उभारण्यात आलेला हा प्रकल्प अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील आणि कंपनीचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी पत्रकार परिषदेत या प्रकल्पाची माहिती दिली.त्यांनी सांगितले की,शिर्डी एमआयडीसी परिसरात सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्प उभारण्यात येत आहेत.यात रॉकेट लाँचर,लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग,स्वयंचलित ड्रोन,तसेच विविध इलेक्ट्रॉनिक संरक्षण यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात उकाडा थांबला, नागरिकांना भरलीय हुडहुडी, 'या' 4 ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या, पाहा Video

मध्यम उद्योगांनाही या प्रकल्पांमुळे मोठी चालना मिळणार

या सर्व प्रकल्पांसाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून,त्यापैकी सुमारे सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच पूर्ण झाली आहे.आगामी काळात या प्रकल्पांमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे चार ते पाच हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांनाही या प्रकल्पांमुळे मोठी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुमारे सहाशे एकर जागेवर भव्य दारूगोळा आणि स्फोटक निर्मिती संकुल उभारले जात आहे.या संकुलात टीएनटी, आरडीएक्स आणि एचएमएक्ससारखी अत्यंत महत्त्वाची स्फोटके आणि प्रणोदक तयार करणारे कारखाने उभारण्यात येणार आहेत.यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित असून दरवर्षी वीस हजार टन टीएनटी उत्पादनाची क्षमता येथे विकसित केली जाणार आहे.सरकारी आणि खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वात मोठी क्षमता ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे टीएनटी आणि आरडीएक्स निर्मितीचे हे प्रकल्प पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत.शिर्डीत तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके भरण्याचे महत्त्वाचे काम बेलवंडी येथील प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहे.त्यामुळे शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एकात्मिक हब म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याचा उद्देश

अहिल्यानगर जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.जिल्ह्यातील रणगाडा प्रशिक्षण केंद्र,के.के.रेंजेस आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे या भागाला संरक्षण क्षेत्रात विशेष महत्त्व आहे.आता नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून या ओळखीला आणखी बळ मिळणार आहे.जिल्हा केवळ कृषी किंवा धार्मिक पर्यटनापुरता मर्यादित न राहता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नक्की वाचा >> Sindhudurg News: तारकरली समु्द्रात पुण्याच्या तरुणाचा करुण अंत, मित्रही सोबत होता, आईसोबत फोनवर बोलला अन्..

शिर्डी हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने पर्यावरण आणि प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.प्रदूषण नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.दरम्यान,स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. 

Advertisement

उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.या केंद्रासाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच एमआयडीसीकडूनही पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.राहाता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर एमआयडीसी परिसरात करण्यात आले असून,भविष्यातील औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन सुपे परिसरात संरक्षण विभागासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियाही प्राथमिक टप्प्यात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

या उद्घाटन सोहळ्यानिमित्त 23आणि 24 मे रोजी शिर्डीत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या आणि शंभरहून अधिक सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.या प्रदर्शनाच्या माध्यमातून युवकांना संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान,रोजगाराच्या संधी आणि उद्योग क्षेत्रातील भविष्यातील दिशा समजून घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

एकीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात,तर दुसरीकडे आता शिर्डी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नवे केंद्र म्हणूनही ओळख निर्माण करत आहे.धार्मिक पर्यटनासोबत औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रातील विकासामुळे शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.जिल्ह्याच्या औद्योगिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना स्थानिक नागरिक आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.