
Mumbai Underground Railway: मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) ने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवण्यासाठी एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी रेल्वेने सविस्तर अभ्यासाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश दक्षिण मुंबईतील रेल्वे मार्गांवरील गर्दी कमी करणे, रेल्वेच्या मालकीची मोक्याची जागा विकासासाठी खुली करणे आणि लोकल गाड्यांची इतर वाहतूक माध्यमांशी जोडणी सुधारणे हा आहे.
कोणते मार्ग भूमिगत होणार?
पश्चिम रेल्वे: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सुमारे 5 किलोमीटरचा हा मार्ग भूमिगत करण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग मुंबई सेंट्रलजवळ पुन्हा जमिनीवर आणला जाईल.
मध्य रेल्वे: सीएसएमटी ते परळ दरम्यान मध्य रेल्वेवरील सुमारे 8 किलोमीटरच्या या पट्ट्यामध्ये अतिरिक्त दोन उपनगरीय मार्ग तयार करण्यावर अभ्यास सुरू आहे. हे मार्ग भूमिगत, उन्नत, जमिनीच्या पातळीवरील किंवा मिश्र स्वरूपात तयार करण्याच्या पर्यायांचा विचार केला जात आहे.
(नक्की वाचा- Central Railway: मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर कसा होणार परिणाम?)
हाती घेतलेल्या या प्रस्तावित भूमिगत मार्गांचे नियोजन करताना, ते फक्त रेल्वेच्या मालकीच्या जागेतच राहतील याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोणतीही खासगी जमीन संपादित करावी लागणार नाही आणि प्रकल्पामध्ये होणारा संभाव्य विलंब टळेल. 'मिड डे'ने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.
भायखळा येथे होणार मोठा इंटरचेंज हब
या महत्त्वाकांक्षी अभ्यासामध्ये भायखळा येथे एक मोठे इंटरचेंज हब विकसित करण्याची शक्यताही तपासली जात आहे. हे हब तयार झाल्यास शहराच्या विविध वाहतूक नेटवर्कची जोडणी मोठ्या प्रमाणात सुधारू शकते.
(नक्की वाचा- Thane-CSMT Metro: ठाण्याहून थेट CSMT मेट्रोनं गाठा; घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार, 21 लाख प्रवाशांना दिलासा)
प्रकल्पाचे अनेक फायदे
- दक्षिण मुंबईतील मोक्याची रेल्वेची जमीन पुनर्विकासासाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी मोकळी होईल.
- उपनगरीय मार्गांची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवाशांना अधिक जलद व गाड्यांची जास्तीची सेवा मिळेल.
- मुंबई मेट्रो, बेस्ट बसेस आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांशी या लोकल ट्रेन मार्गांची थेट जोडणी होईल.
लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या जागतिक शहरांमधील यशस्वी शहरी रेल्वे प्रणालींचा अभ्यास केला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, मुंबईतील लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास पूर्णपणे बदलेल आणि शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांना एक आधुनिक स्वरूप मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world