जाहिरात

Induri Chaat Dadar: दादरमध्ये मनसे नेत्याचं 'इंदुरी' हॉटेल; प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्नाही झाल्या फॅन

Induri Chaat Ani Barach Kahi: दादरमधील खाद्यसंस्कृतीच्या वैभवात भर टाकणारं "इंदुरी चाट आणि बरंच काही...." एक नवं हॉटेल नुकतंच सुरु झालंय.

Induri Chaat Dadar: दादरमध्ये मनसे नेत्याचं 'इंदुरी' हॉटेल;  प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्नाही झाल्या फॅन
Induri Chaat: प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी नुकतीच या हॉटेलला भेट दिली.
मुंबई:

Induri Chaat Ani Barach Kahi: मुंबई शहराच्या मध्यवर्ती असलेलं दादर हे खाद्यसंस्कृतीचंही केंद्र आहे. सर्व प्रकारच्या खाद्यप्रेमींना समाधान मिळेल असे पदार्थ इथं यायला मिळतात. ही पदार्थ वर्षानुवर्ष बनवणारी दादरमधील हॉटेल्स ही फक्त मुंबईत नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. दादरमधील खाद्यसंस्कृतीच्या वैभवात भर टाकणारं "इंदुरी चाट आणि बरंच काही...." एक नवं हॉटेल नुकतंच सुरु झालंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे या हॉटेलचे मालक आहेत.  

प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी नुकतीच या हॉटेलला भेट दिली. त्यांनी देखील या हॉटेलचं कौतुक केलं आहे. संदीप देशपांडे यांनी स्वत: सोशल मीडिया नेटवर्क X वर ही माहिती शेअर केलीय. 

इंदुरी खाद्यपदार्थांचा इतिहास

मध्य प्रदेशातील प्रमुख शहर असलेल्या इंदूरचा महाराष्ट्राशी जुना संबंध आहे. पहिल्या बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांच्या राजवटीत मराठा सरदार मल्हाराव होळकर यांनी इंदूर हे त्यांचं केंद्र केलं. हे शहर वसवण्यात विकसित करण्यात होळकर घराण्याचं मोठं योगदान आहे. आजही या शहरावर मराठी संस्कृतीची छाप आहे. 

आज इंदूर हे खवय्यांचं आवडतं शहर आहे. येथील खाऊ गल्ली आणि विशेषत: पोहे हे जगप्रसिद्ध आहेत. इंदुरी संस्कृतीची ओळख असलेले हे खाद्यपदार्थ सुरु करण्यातही मराठी माणसांचं मोठं योगदान आहे. 

मल्हाराव होळकर 1724 साली इंदूरमध्ये गेले. त्यांनी  1732 मध्ये त्यांनी इंदूरमध्ये होळकर घराण्याची औपचारिक स्थापना केली.  मल्हारावांनी त्यांच्यासोबत महाराष्ट्रीयन आचारी नेले होते. तिथे गेल्यावर, त्यांनी पोहे आणि साबुदाणा खिचडीसारखे फ्यूजन पदार्थ तयार केले, जे पारंपरिक पद्धतीने फोडणी देऊन बनवले जातात, पण इंदूरमध्ये ते वाफेवर (steam) बनवले जातात. इंदुरी पदार्थांमध्ये नमकीनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, जो साधारणपणे महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये वापरला जात नाही. आणि त्यातच इंदुरी पदार्थांची चव आणि सुगंधाची खासियत आहे.

( नक्की वाचा : New GST Rates: बाहेर जेवायला जाताय? आता तुमचा खिसा जास्त रिकामा होणार नाही! वाचा कसा होणार तुमचा फायदा )
 

कशी सुचली संकल्पना?

संदीप देशांपाडे यांनी काही दिवसांपूर्वी 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये या हॉटेलची संकल्पना आणि ते सुरु करण्याचा उद्देश सांगितला. 'आपण स्वत: काही तरी सुरु करावं असं माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसांपासून होतं. तर मी बघितलं साऊथ इंडियन, चायनिज, पंजाबी खाद्यपदार्थांचे पर्याय बरेच उपलब्ध आहेत. दादरमध्ये 'प्रकाश' 'आस्वाद' सारखे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ देणारे बरेच हॉटेल आहेत. काही तरी वेगळं लोकांना दिलं पाहिजे, असं मला वाटलं, 'असं देशपांडे यांनी सांगितलं.

याबात बोलताना देशपांडे पुढे म्हणाले की, 'मी इंदूरला गेलो होतो. मी तिथे तीन-चार दिवस होतो. त्या कालावधीमध्ये तेथील खाद्यपदार्थ बरेच खाल्ले. तेथील इंदुरी पोहे बनवण्याची पद्धत वेगळी आहे. साबुदाना खिचडी, बेडी पुरी हे तेथील पदार्थ मला वेगळे निघाले. त्यानंतर मी काही जणांशी चर्चा केली. माझा एक मित्र इंदुरी पोह्यांचा शेफ आहे. त्यानंतर हा व्यवसाय सुरु झाला.

इंदूर शहर हे देखील मराठा साम्राज्यानं विकसित केलं आहे. होळकरांनीच त्याची पायाभरणी केली. खाद्यपदार्थ इंदुरी असले तरी ते मराठी पदार्थांचं फ्युजन आहे. मुंबईकरांना वेगळी टेस्ट मिळावी हा याचा उद्देश होता. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. 

मराठी माणूस व्यवसायात पुढं जाऊ शकत नाही हा प्रवाद मला खरा वाटत नाही. उलट सर्वांचे व्यवसाय मराठी माणूसच चालवतो. अनेक मोठ्या कंपन्यांचे CEO हे मराठी आहेत,' असंही देशपांडे म्हणाले.

कोणते पदार्थ प्रसिद्ध?

या हॉटेलमध्ये पोहे आणि साबुदाणा खिचडी हे तेल न वापरता वाफेवर केले जातात. कढी वडा, कांजी वडा, इंदुरी नमकीन आणि शेव हे पदार्थ येथील चांगलेच प्रसिद्ध आहेत. येथील पदार्थांची किंमत 50 ते 150 रुपयांच्या दरम्यान आहेत, अशी माहिती देशपांडे यांनी दिली. 


हॉटेलचा पत्ता

'इंदुरी चाट आणि बरंच काही'
दुकान क्र. 2, इंदुरी नमकीन चाट, रानडे रोड, चंदेकर स्वीट्सच्या समोर, धुरू वाडी, दादर पश्चिम, दादर, मुंबई, महाराष्ट्र 400028
वेळ: 8AM - 9PM (Non AC) | 11AM - 9PM (AC)
सोमवार बंद
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com