जाहिरात

Mumbai News: दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त, वाहतूक कोंडीला ब्रेक; माटुंगा पोलिसांची धडक कारवाई

Mumbai News: मुंबईतील दादर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाईक करण्यात आलीय.

Mumbai News: दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त, वाहतूक कोंडीला ब्रेक; माटुंगा पोलिसांची धडक कारवाई
"Mumbai News: दादरमध्ये पोलिसांची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई"

- ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News: मुंबईतील दादर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात माटुंगा पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला आहे. स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात बसत असल्याने वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण होत होती. याचा फटका केवळ वाहनचालकांनाच नव्हे तर पायी चालणाऱ्या प्रवाशांनाही सहन करावा लागत होता. फेरीवाल्यांमुळे रस्ते अरुंद होत होते, तर प्रवाशांना चालण्यासाठी जागाच उरत नव्हती. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर माटुंगा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले. या कारवाईमुळे परिसरात वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे पुन्हा फेरीवाले बसणार नाहीत, यासाठी पोलिसांकडून नियमित नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. माटुंगा पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

भेंडीबाजारातही अनधिकृत बांधकामांवर कारवाई

दुसरीकडे अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी' प्रशासकीय विभागाकडून 2 फेब्रुवारी रोजी हटवण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त  (परिमंडळ-1) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (बी विभाग) योगेश देसाई यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

(नक्की वाचा: Pune Mumbai Expressway: एक्स्प्रेस वेवर महाभीषण वाहतूक कोंडी; तब्बल 20 कोटींचे नुकसान, हजारो प्रवासी अडकले)

भायखळ्यामध्ये स्वच्छता मोहीम

मोहम्मद अली मार्ग हा भेंडीबाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. इब्राहिम मर्चंट मार्ग हा रस्ता नागदेवी आणि मांडवी परिसराच्या जवळ आहे. हे दोन्ही रस्ते व्यापारी दृष्टीने आणि रहदारीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्‍ही मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱ्यांना पदपथांवर चालण्यास अडथळा निर्माण होत होता.

पोलीस बंदोबस्तात कारवाई

या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. सात अनधिकृत दुकाने हटवण्‍यात आली तसेच 12 ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, 10 बोलार्ड, दोन बेवारस वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची 4 वाहने, 2 जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे 40 अधिकारी - कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता.

या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत / वाढीव बांधकामांविरोधात नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केलंयकडून कळवण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com