रामराजे शिंदे, नवी दिल्ली
PM Modi - Eknath Shinde Meet: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत नेमकं काय झालं याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवरून आपली खदखद आणि नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती मिळत आहे. महायुतीत काही गोष्टी अपेक्षित पद्धतीने होत नसल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
एकनाथ शिंदेंनी PM मोदी आणि अमित शाहांसमोर मांडलेले प्रमुख मुद्दे
- उद्धव ठाकरे हे राजकीय विरोधक असतानाही महायुतीमधील काही नेते त्यांच्याशी जवळीक साधत आहेत. हे योग्य नसल्याचे शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले.
- शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंचा आग्रह आहे. निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्यामुळे मंत्र्यांवरील कारवाईमुळे पक्ष डॅमेज होण्याची भिती देखील शिंदेंनी व्यक्त केली.
- राज्यात शिंदे गटाला आणि त्यांच्या सरकारला जाणूनबुजून बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत, हे थांबवले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.
- आगामी काळात महायुतीमध्ये कोणती भूमिका घ्यायची, याबाबत आधीच स्पष्टता मिळावी, अशी त्यांची मागणी होती.
- आगामी निवडणुकांमध्ये होणाऱ्या जागावाटपात शिंदेंच्या पक्षाला योग्य मानसन्मान मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या टार्गेट केले जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.
- केंद्राच्या मंत्रिमंडळात आपल्या गटाला महत्त्वाचे मंत्रिपद दिले जावे, अशी मागणीही त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासोबतच्या या बैठकीमुळे राज्यातील महायुतीच्या राजकारणात काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या मागण्यांवर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.