जाहिरात
This Article is From Mar 11, 2024

अमेरिका अन् लंडन पार्कच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क

या भूखंडावर जनतेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क बीएमसीद्वारे विकसित करण्यात येणार आहे.

अमेरिका अन् लंडन पार्कच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क
मुंबई:

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क, लंडन येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे. हा भूखंड शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यावर जनतेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क बीएमसीद्वारे विकसित करण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या मोकळ्या जागेचा वापर मुंबईकर रोज योगासने, धावणे, चालण्यासाठी करतात. त्यामुळे या मोक्याच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्याची तयारी सरकारने केली आहे. 

महालक्ष्मी रेसकोर्स येथील भाड्याने दिलेल्या भूखंडावरील कराराचे 1 जून 2013 ते या भूभागाचा प्रत्यक्षात ताबा घेण्याच्या दिनांकापर्यंतच्या नुतनीकरण करण्यात मान्यता देण्यात आली आहे. 

रेस कोर्स कायम ठेवत येथे आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क बनवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मानस आहे. हा एखाद्या ऑक्सिजन पार्कसारखा असेल. येथे कोणतंही बांधकाम केलं जाणार नाही. येथे लहान मुलांसाठी खेळण्याची सोय असेल. महिलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही येथे येऊन चांगला वेळ घालवू शकतात. 

पर्यावरण प्रेमींचा आक्षेप का?

या मोकळ्या जागेवर बांधकाम करण्यावर पर्यावरण प्रेमींनी आक्षेप व्यक्त केला आहे. शहरांमध्ये मोकळ्या जागा कमी आहेत. त्यात महालक्ष्मी रेस कोर्सवर नागरिक धावायला, व्यायाम करायला आणि लहान मुलं खेळायला येत असतात. आधीच मुंबईत मोकळ्या जागांची वानवा आहे. त्यात या जागेवरही बांधकाम झालं तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल. महालक्ष्मी रेसकोर्स हे १४० वर्षे जुने असून त्याला पुरातन वास्तूचा दर्जा आहे. तसेच मुंबईतील ही एकमेव एवढी मोठी जागा आहे जिथे जमीन माती व गवताची आहे. ज्यामुळे पाणी मातीत झिरपू शकते. अशा जागेचा पुनर्विकास न करता ती जतन करावी अशी त्यांची भूमिका आहे व त्याकरीता त्यांनी मोहीमही सुरू केली आहे.

पालिकेची भूमिका..

रेसकोर्सवर सध्या सर्वसामान्य नागरिकांना केवळ सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास फिरण्याची मुभा आहे. मात्र काही जागेवर संकल्पना उद्यान झाल्यास मुंबईकरांना विरंगुळ्याची एक जागा चोवीस तासांसाठी उपलब्ध होईल, असे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: