
महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. 10, 13 व 17 फेब्रुवारी रोजी 26 जिल्ह्यात 45 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी विभागा मार्फत https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केल्याचे सहआयुक्त राहुल मोरे यांनी सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संरक्षण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) दोन पदे, परिविक्षा अधिकारी गट-क 72 पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी) गट -क एक पद, लघुलेखक (निम्नश्रेणी) गट -क दोन पदे, वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहाय्यक गट-क 56 पदे, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)गट- क 57 पदे, वरिष्ठ काळजी वाहक गट -ड चार पदे, कनिष्ठ काळजी वाहक गट -ड 36 पदे, स्वयंपाकी गट -ड सहा पदे या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील 236 रिक्त पदे भरण्याकरीता कॉम्पुटरबेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परिक्षा टीसीएस मार्फत घेण्यात येणार आहे.
परिक्षार्थी यांचे स्थानिक व जिल्ह्या लगतच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत केंद्र समवेक्षक व पर्यवेक्षक, तर आयुक्तालयामार्फत निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व केंद्रांवर सिग्नल जॅमर बसविण्यात येणार आहे. यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार आहे. तसेच, केंद्रांवर बायोमेट्रीक व आय स्कॅनिंग व फेस रिडींग केले जाणार आहे.
तसेच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना पुरेसा बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला अथवा अफवांना बळी पडू नये, कुणीही गैरमार्गाने नोकरी देण्याचे अथवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष दाखवित असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त मोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालय कार्यालय किंवा 020-26333812 या क्रमांकावर संपर्क साधाण्याचे आव्हान केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world