- कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसर विकासात बेकायदा दुचाकी पार्किंगमुळे वाहतूक अडचणी वाढल्या आहेत
- केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी दुचाकी पार्किंग विरोधात त्वरित कारवाईची सूचना केली
- बेकायदा पार्किंग विरोधात महापौरांनी धडक मोहीत हाती घेतली आहे.
अमजद खान
कल्याण पश्चिमेत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. या परिसरात रस्त्यावर लोक दुचाकी उभी करुन कामाला जातात. यामध्ये सगळ्यात जास्त संख्या पोलिसांची आहे. शिवाय सरकारी कर्मचारी ही मोठ्या संख्येने आहेत. केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी या परिसराची पाहणी केली. बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी पाहून महापौर यावेळी संतापल्या. या दुचाकी चालकांच्या विरोधात त्वरीत कारवाई करण्याची सूचना महापौरांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर वाहतूक विभागाने या दुचाकी चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. असा प्रकार पुन्हा घडू नये अशी सूचना पोलिसांना करण्यात आली आहे.
11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या महापौर हर्षाली थवील चौधरी यांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. कल्याण स्टेशन परिसरात महात्मा फुले यांचा स्मारक आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात काम सुरु आहे. या परिसरात अस्वच्छता आणि स्मारकासमोर बेकायदा पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी पाहून महापौर संतापल्या.
महापौरांच्या सोबत कल्याणचे एसीपी कल्याण जी घेटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे हे देखील होते. पार्किंग करण्यात आलेल्या सगळ्यात जास्त दुचाकी या पोलिसांच्या होत्या. सकाळच्या वेळी दुचाकी चालक गाड्या पार्क करुन कामावर निघून जातात. महापौर थविल यांनी त्वरीत बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याची सूचना केली. वाहतूक पोलिस त्वरीत त्या ठिकाणी दाखल झाले. बेकायदा पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. कल्याण डोंबिवलीत पार्कींगचा मोठा प्रश्न आहे. लोक कुठे ही कधी ही पार्कींग करतात. त्यामुळे वाहतूकीची मोठी अडचण निर्माण होते.
या दरम्यान त्याठिकाणी पार्क करण्यात आलेल्या 28 वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. कारवाई अद्याप सुरुच आहे. सकाळच्या वेळी फास्ट ट्रेन पकण्यासाठी पोलिस आणि काही कर्मचारी अधिकारी यांच्या गाड्या पार्क केल्या जातात. शहाड उल्हासनगर येथूनही लोक कल्याण स्थानकातून गाडी पकडण्यासाठी येतात. गाड्या पार्क करुन निघून जातात. सध्या ही कारवाई सुरु आहे. हा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि बेकायदा पार्किंग मुक्त करण्यात यावा अशा सूचना महापौरांनी संबंधित अधिकारी वर्गास दिल्या आहेत. महापौरांच्या या धडक कारवाईमुळे त्यांचे कौतूक होत आहे. शिवाय यात सातत्य राहीले पाहीजे अशी मागणी ही नागरिक करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world