Kalyan News: रणरणत्या उन्हाचे चटके, अंगाची लाहीलाही करणारी उष्णता आणि डोक्यावर सावलीचा पत्ता नाही. ही परिस्थिती एखाद्या सुदृढ माणसालाही घाम फोडणारी आहे, पण दुर्दैवाने या भीषण उन्हात कल्याणमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना ना वेळेवर पाणी मिळाले, ना जेवण. विशेष म्हणजे, जो खेळ आणि आनंद त्यांच्यासाठी आयोजित केला होता, तोच त्यांच्यासाठी छळवणूक ठरला आहे.
कल्याणमधील सुभाष मैदानात आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेने प्रशासकीय असंवेदनशीलतेचा कळस गाठला असून, यावरून आता शिक्षक आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ठाणे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वास्तविक पाहता, दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून या स्पर्धा घेतल्या जातात. मात्र, डिसेंबरमधील या स्पर्धा चक्क मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात का घेतल्या गेल्या, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात, जेव्हा पारा 35 ते 40 अंशांच्या आसपास असतो, तेव्हा या दिव्यांग मुलांची मैदानात फरफट का केली गेली, याचे उत्तर कोणाकडेही नाही.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीत युद्धाचा 'धूर',पार्किंगमध्ये पेटल्या चुली, शेफ तोडतायत लाकडं! प्रसिद्ध हॉटेलवर वेळ )
नियोजनाचा अभाव आणि विद्यार्थ्यांचे हाल
कल्याणच्या सुभाष मैदानात पार पडलेल्या या स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी साध्या सोयीसुविधांचाही अभाव होता. मैदानात उन्हापासून वाचण्यासाठी कोठेही शेडची व्यवस्था नव्हती की पिण्याच्या पाण्याची सोय. विद्यार्थ्यांसह त्यांच्या सोबत आलेल्या पालकांनाही तापलेल्या जमिनीवर बसून राहण्यावाचून पर्याय नव्हता.
दुपारचे रणरणते ऊन आणि त्यात शौचालय किंवा जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने या दिव्यांग मुलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. अनेक विद्यार्थी उन्हाच्या तडाख्यामुळे हवालदिल झाले होते, तर काही पालकांनी प्रशासनाच्या या अघोरी नियोजनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

शिक्षकांनी व्यक्त केला संताप
गेल्या 20 वर्षांपासून कर्णबधिर विभागात कार्यरत असलेले शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक कांतीलाल परदेशी यांनी प्रशासकीय भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितले की, दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धा मार्चमध्ये कशासाठी आयोजित केल्या जातात, हे एक मोठे कोडे आहे.
हे मैदान दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अजिबात सक्षम नाही. येथे ना पाण्याची सोय आहे, ना बसण्याची. स्वतःला सक्षम समजणारे अधिकारी याठिकाणी फिरकले देखील नाहीत. विद्यार्थ्यांची झालेली ही अवस्था पाहून मनाला प्रचंड वेदना होत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दिव्यांग मुलांच्या भावनांशी आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आयोजकांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आणि निधी खर्च करण्यासाठी अशा पद्धतीने उन्हाळ्यात स्पर्धा उरकून घेतल्या जात आहेत का, असा संशयही आता व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world