Kalyan News: कल्याणमध्ये अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे काढणारी एक अत्यंत संतापजनक आणि काळिमा फासणारी घटना कल्याण पूर्वेत उघड आहे. अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे तीन दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची घटना घडलेली असताना, पुन्हा एकदा त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कृत्य घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या धाकावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घृणास्पद घटना घडली आहे. पीडित चिमुरडी आणि आरोपी दोघेही मूळचे उत्तर प्रदेशमधील एकाच गावचे रहिवासी आहेत. आरोपी जुमयी आली शेख हा 55 वर्षांचा असून तो गेल्या 2 वर्षांपासून या परिसरात राहत होता. आज सकाळी (बुधवार 24 जून 2026) 9 च्या सुमारास या नराधमाने अत्यंत नीच कृत्य केले.
चिमुरडीला टोमॅटो देण्याच्या बहाण्याने त्याने स्वतःच्या घरी बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अनुरागसिंग देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. संतापलेल्या नागरिकांनी या नराधमाला चांगलाच चोप दिला असून सध्या कोळशेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
( नक्की वाचा : Pune News : आधी पासपोर्ट चोरीला, मग लोहगडावर नेलं..केतनच्या वडिलांनी सांगितलं सियानं कसं केलं होतं हत्येचं प्लॅनिंग )
कोळशेवाडी परिसरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का?
कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याची हद्द जणू नराधमांचे केंद्र बनत चालली आहे की काय, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. अवघ्या 3 दिवसांपूर्वी याच कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी आहे. ती घटना शांत होत नाही तोच हा दुसरा धक्का बसला आहे.
इतकेच नाही तर 2 वर्षांपूर्वी याच हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली होती. या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे कोळशेवाडी पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक उरला आहे की नाही, असा थेट सवाल जनता विचारत आहे.
( नक्की वाचा : Pune News: सियाच्या अफेयरची घरातील मंडळींना होती कल्पना, 35 वर्षांच्या मैत्रीमध्ये कुणी कालवलं विष? वाचा... )
राजकीय पक्ष रस्त्यावर, जनतेचा संताप अनावर
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच कल्याण पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला. भाजप, शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात गोळा झाले.शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद पाटील, एडवोकेट नीरज कुमार, मनसे नगरसेविका शितल मांढरी, भाजपा पदाधिकारी रेखा चतुर्वेदी हिंदूवादी संघटनेचे पदाधिकारी अनुरागसिंह, अनिल तिवारी, या सोबतच कार्यकर्ते पदाधिकारी कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले होते.कल्याण पूर्वेत महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसल्याने सर्वच राजकीय पक्ष कमालीचे आक्रमक झाले आहेत.
पोलिसांनी नराधमांना असा धडा शिकवावा की पुन्हा कोणाची अशी हिंमत होणार नाही, अशी मागणी केली जात आहे. भरदिवसा घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या गस्तीवर आणि खाकीच्या धाकावर आता सामान्य जनतेने जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world