जाहिरात

Kalyan News : भरदिवसा हल्ला अन् 2 महिने फरार; कल्याणमधील 'त्या' दहशतीचा अंत? बड्या आरोपींची चौकशी सुरू

Kalyan News: व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला की यामागे आणखी काही मोठे षडयंत्र आहे, याचा उलगडा आता पोलिसांच्या कारवाईतून होण्याची शक्यता आहे.

Kalyan News : भरदिवसा हल्ला अन् 2 महिने फरार; कल्याणमधील 'त्या' दहशतीचा अंत? बड्या आरोपींची चौकशी सुरू
Kalyan News : दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कल्याण पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan News:  कल्याण शहरात दोन महिन्यांपूर्वी एका बड्या व्यावसायिकावर झालेल्या रक्तरंजित हल्ला झाला होता. भरदिवसा झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणाचा तपास करत असताना बाजारपेठ पोलिसांनी आता मोठी कारवाई केली असून फरार असलेल्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला की यामागे आणखी काही मोठे षडयंत्र आहे, याचा उलगडा आता पोलिसांच्या कारवाईतून होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याणमधील व्यावसायिक विशाल नायडू यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले होते, ज्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पाठलाग सुरू ठेवला होता. अखेर दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पोलिसांनी यातील तेजस ठाकरे, शुभम नाडे आणि सुजय कदम या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे कल्याणमधील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: बैठक सुरू झाली अन् अचानक 60 - 70 जण घुसले; कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शाखेत जोरदार राडा )

मुख्य आरोपीला जामीन

या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार म्हणून प्रशांत देशमुख यांचे नाव समोर आले होते. विशाल नायडू यांच्यावर झालेला हल्ला हा प्रशांत देशमुख यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा प्राथमिक आरोप होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, मात्र अटकेपूर्वीच प्रशांत देशमुख यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने त्यांना यापूर्वीच अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने ते सध्या अटकेपासून दूर आहेत. मात्र, प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेले त्यांचे साथीदार आता पोलिसांच्या कोठडीत पोहोचले आहेत.

Latest and Breaking News on NDTV

25 मेपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांना 25 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटक केलेल्यांपैकी प्रतीक ठाकरे याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या हल्ल्याचा कट आधीच रचला गेला होता का, याची सखोल चौकशी आता सुरू झाली आहे.

Latest and Breaking News on NDTV

हल्ल्याचे कारण काय?

विशाल नायडू आणि प्रशांत देशमुख यांच्यात नेमका कशावरून वाद होता, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्राथमिक तपासात ही व्यावसायिक स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठडीत असलेल्या आरोपींकडून हल्ल्याचे नेमके कारण आणि त्यामागे वापरलेली शस्त्रे कोठून आली, याचा तपास केला जात आहे. या चौकशीतून कल्याणमधील आणखी काही बड्या नावांचा समावेश या कटात आहे का, हे देखील स्पष्ट होणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com