Kalyan News: शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान लोकल किंवा एक्सप्रेसने प्रवास करताना दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या 'फटका गँग'च्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. धावत्या अमरावती एक्सप्रेसमधील प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून मोबाईल पाडणाऱ्या या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही एक मोठी आणि दिलासादायक कारवाई मानली जात आहे.
अमरावती एक्सप्रेसमध्ये घडला प्रकार
काही दिवसांपूर्वी अमरावती एक्सप्रेसमधून एक प्रवासी प्रवास करत होता. गाडी शहाड ते आंबिवली दरम्यान धावत असताना, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला दबा धरून बसलेल्या चोरट्याने प्रवाशाच्या हातावर बांबूने जोरात फटका मारला. या अचानक बसलेल्या फटक्यामुळे प्रवाशाच्या हातातील महागडा मोबाईल थेट खाली पडला.
मोबाईल खाली पडताच चोरट्याने तो उचलून तिथून पळ काढला. या अनपेक्षित प्रकारामुळे हादरलेल्या पीडित प्रवाशाने थेट कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत या चोरीची तक्रार दाखल केली. रेल्वे प्रवासातील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली.
कशी केली अटक?
प्रवाशाच्या तक्रारीनंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी शहाड ते आंबिवली दरम्यानच्या रेल्वे रुळांच्या परिसरातील माहिती आणि गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासले. तपास सुरू असतानाच पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली.
हातावर फटका मारून मोबाईल पळवणारा चोरटा पुन्हा एकदा त्याच रेल्वे रुळांच्या परिसरात अशाच प्रकारचा नवा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने रेल्वे रुळांच्या परिसरात सापळा रचला आणि हसन दारा जफर या फटका गँगच्या सराईत सदस्याला अत्यंत शिताफीने रंगेहात ताब्यात घेतले.
नक्की वाचा : Palghar News : MPSC एकत्र पास झाले, पण एका कारणामुळे बिघडले संबंध, पालघरमध्ये तरुणाचे तरुणीवर सपासप वार )
अनेक गुन्ह्यांची उकल होणार?
पोलिसांनी आरोपी हसन जफर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान आरोपीकडून फिर्यादी प्रवाशाचा चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा चोरटा फटका गँगचा सक्रिय सदस्य असून, त्याने यापूर्वीही रेल्वे प्रवाशांना अशाच प्रकारे लक्ष्य केले असण्याची दाट शक्यता आहे.
त्याने अशाच पद्धतीने आणखी किती प्रवाशांचे मोबाईल चोरले आहेत आणि त्याच्यासोबत या गँगमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, या दिशेने पोलिसांकडून आता सखोल तपास सुरू आहे. या तपासातून रेल्वेतील अनेक मोबाईल चोऱ्यांच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Badlapur News: 48 वार करून महिलेचा खून, नंतर स्वतःवर केले 8 वार; बदलापुरातील घटनेने सर्वच सून्न, वाचा सविस्तर )
ही महत्त्वपूर्ण आणि यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि त्याच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत. रेल्वे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दररोज लोकल आणि एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, फटका गँगच्या त्रासातून काहीसा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world