अमजद खान
प्रादेशिक हवामान विभागाने 4 जुलै 2026 रोजी ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिवार 4 जुलै रोजी केडीएमसी हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच वेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी एक पत्रक काढले आहेत. त्यात त्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शनिवार- रविवारच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. कोणीही पूर्व परवानगी घेतल्या शिवाय मुख्यालय किंवा कार्यालय सोडू नये असे या आदेशात म्हटले आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार 1 ते 3 जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर 4 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी 5 जुलै रोजी पुन्हा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत काही ठिकाणी पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे, तसेच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केडीएमसी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हा आदेश राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, सीआयई या सर्व बोर्डांच्या तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यीत शाळा व महाविद्यालयांना लागू असणार आहे. याशिवाय, पुढील काही दिवस हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा ही सुचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देशही शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे शनिवारी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळा महाविद्यालय बंद राहाणार आहेत. ठाणे जिल्ह्यात उद्या म्हणजेच शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पावसात निर्माण होणारी परिस्थिती पाहात कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आली आहे. पावसाच्या काळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्टा रद्द करण्यात आल्या आहे. शनिवारी रविवारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन दिवसात कुणालाही सुट्टी घेता येणार नाही असं आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. कल्याण डोंबिवलीत पहिल्याच पावसात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्याचे पडसात महासभेतही उमटले होते. त्यामुळे खरबदारीची भूमीका केडीएमसीने घेतल्याचं बोललं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world