कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्याप महायुतीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. या अनिश्चिततेमुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली असून, कल्याण पूर्वेत नाराजीचा स्फोट झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख मनोज चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे सोपवला आहे.
काय आहे राजीनाम्याचे कारण?
मनोज चौधरी हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. ते पॅनल क्रमांक 18 'अ' मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, ही जागा महायुतीत भाजपच्या रेखा चौधरी यांना सुटल्याची माहिती समोर आली. यामुळे कमालीचे नाराज झालेल्या मनोज चौधरी यांनी पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. "30 वर्षे पक्षासाठी रक्त आटवले, पण ऐनवेळी जागा मित्रपक्षाला सोडली गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा आहे," असे त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग)
भाजप आणि शिवसेनेतील वादाचे केंद्र
कल्याण पूर्वमध्ये आमदार सुलभा गायकवाड यांच्या मतदारसंघात भाजपला फक्त सात जागा मिळाल्याच्या चर्चेमुळे शनिवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. "आम्हाला युती नको, स्वबळावर लढू," अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे.
तर डोंबिवली पॅनल क्रमांक 22 मधील संदेश पाटील यांची जागा भाजपला सोडल्याने डोंबिवलीतही शिवसैनिकांमध्ये संताप आहे. संदेश पाटील आता अपक्ष लढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
महायुतीसमोर मोठे आव्हान
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता आपल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचे मोठे आव्हान आहे. बंडखोरी रोखण्यासाठी अद्याप एबी फॉर्मचे वाटप थांबवण्यात आले आहे, मात्र यामुळे उमेदवारांची चिंता अधिकच वाढली आहे.