जाहिरात

Dombivli : '... ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत!' राजू पाटलांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं ! वाद पेटणार?

KDMC News : कल्याण-डोंबिवलीमधील विकास कामांच्या मुृद्यावर शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष नवा नाही.

Dombivli : '... ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत!' राजू पाटलांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं ! वाद पेटणार?
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवलीमधील विकास कामांच्या मुृद्यावर शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष नवा नाही. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील (Raju Patil) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यात हा संघर्ष सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत दोघांमधील वाद चांगलाच तापला होता. राजू पाटील यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतरही हा वाद थांबलेला नाही.

राजू पाटील यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. त्यामुळे दोघांमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला 'कामाचे बोला' अशी सूचना केली होती. त्यावर राजू पाटील यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले आहेत. पाटील यांनी या ट्विटमध्ये म्हंटलंय

जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……! 

परवा आमचे पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात संबंधित पत्रकाराला चिडून बोलले की कामाचे बोला ! चला तर मी पण काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोच. किमान नगरविकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे. 

पलावा पुल कधी होईल ?

लोकग्राम पुल कधी होईल ?

दिवा रेल्वे ROB कधी होईल ?

बिल्डरांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल ? आणि जर ते झाले नसेल तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी सुरू केलेले मेट्रोचे हे काम,ज्यामुळे वाहतुक कोंडीत अधिकच भर पडत आहे ते काम कधी स्थगित करणार ?

कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळेल व तिसरी लाईन कधी होईल ?

पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामांच्या जागा मालकांना मोबदला देऊन ती बांधकामं तोडून पलावा चौक मोकळा करून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू करणार ?

27 गावांसाठी असलेली अमृत योजना कधी पूर्ण करणार ?

कल्याण-डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला १४० एलएलडी पाणी कोटा आम्हाला कधी वर्ग करणार ?

अनधिकृत पणे सुरू केलेला दिवा डंपिंग कधी बंद करणार ?

नवी मुंबईत नव्याने घेतलेल्या १४ गावांच्या विकासासाठी आवश्यक ५९०० कोटी रूपयांचा पॅकेज कधी देणार ?

कल्याण-डोंबिवलीतल्या २७ गावांचा प्रश्न कधी मार्गी लावणार ?

मानपाडा रोड व कल्याण-शीळ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कधी हटविणार ?

असे प्रश्न विचारत राजू पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे. त्यावर शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: