Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक अतिशय वेगळे आणि भावनिक वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असतानाच, मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या आई-वडिलांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. आपली स्वतःची मुलगी जरी या गुन्ह्यात दोषी आढळली, तरी तिला थेट फासावर लटकवा, अशी अत्यंत कठोर आणि न्याय्य मागणी सियाच्या आई-वडिलांनी जाहीरपणे केली आहे.
'सियाला फासावर लटकवा'
NewsDotz या यूट्यूब वाहिनीला सियाच्या आई-वडिलांनी मुलाखत दिली आहे . त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सियाची आई पूजा गोयल म्हणाल्या की, या घटनेमुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे. केतनचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझा स्वतःचा मुलगा साहिल यानेही माझ्यावर कधी इतके प्रेम केले नसेल, जितके केतनने केले. मला केतनसाठी अत्यंत वाईट वाटत आहे.
केतनची हत्या ज्याने कोणी केली आहे, त्याला कडक शिक्षा मिळालीच पाहिजे. हे कृत्य नेमके कोणी केले, हे त्या देवालाच ठाऊक आहे. माझी मुलगी सिया हिने हा गुन्हा केला असेल, तर तिलाही फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी एका आईने पूर्ण जबाबदारीने केली आहे.
( नक्की वाचा : Lohagad Fort Case: सिया आणि चेतनंचं CCTV फुटेज व्हायरल, पाहा कॅफेत कसं केलं केतनच्या हत्येचं प्लॅनिंग, VIDEO )
गुन्हेगाराला फाशीच द्या
लग्नाच्या तयारीबाबत पसरलेल्या अफवांवर स्पष्टीकरण देताना सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सांगितले की, लग्नासाठी कोणतेही महाल किंवा चार्टर्ड विमान बुक करण्यात आले नव्हते. आमची तेवढी क्षमताही नाही. जुलै महिन्यात बुकिंग संदर्भात अग्रवाल कुटुंबाशी बोलणे होणार होते. आम्ही सर्व वऱ्हाड्यांना पुणे ते अहमदाबाद आणि तिथून पुढे रस्ते मार्गाने जयपूरला नेणार होतो. त्यामुळे चार्टर्ड विमानाची बातमी पूर्णपणे खोटी आहे. प्रवीण गोयल यांनी पुढं सांगितलं की, जे कोणी आरोपी आहेत, त्यांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयात जर सियाने ही हत्या केल्याचे सिद्ध झाले, तर तिलाही फाशी द्या, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांच्या तपासानुसार, 20 वर्षांची सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी मिळून 18 जून रोजी पुणे जवळील लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवालला खोल दरीत ढकलून दिले होते. सिया आणि केतनचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचे लग्न होणार होते. केतन कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायात संचालक होता. घटनेनंतर सियाने हा अपघात असल्याचा बनाव केला होता, मात्र पोलिसांच्या तपासात हत्येचा कट उघड झाला आणि 23 जून रोजी दोघांना अटक करण्यात आली.
( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )
तपासात समोर आले की, सिया आणि चेतन गेल्या वर्षी दिवाळीत भेटले होते. त्यांनी 6 महिन्यांत एकमेकांना 2000 पेक्षा जास्त कॉल केले होते आणि सुमारे 238 तास त्यांचे संभाषण झाले होते. सियाने केतनला अनेकदा लोहगडला नेण्याचा हट्ट केला होता. 14 जून रोजी तिने केतनला कड्यावरून ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला होता, पण केतनने झाडाला पकडल्याने तो वाचला होता. तेव्हा सियाने साप आल्याचे खोटे सांगून स्वतःचे पाप लपवले होते. अखेर 18 जून रोजी पुण्यातील एका कॅफेमध्ये अंतिम कट रचून त्यांनी केतनला दरीत ढकलून दिले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world